अजिंक्य रहाणे ते इशांत शर्मा... 'या' 5 खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळणं जवळपास अशक्यच!

Team India Test Cricket: भारतीय संघ आगामी काळात बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाशी खेळणार कसोटी मालिका

Team India Test Cricket: बांगलादेश विरुद्ध घरच्या कसोटी मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मासारखे अनुभवी खेळाडू खेळणार आहेत. त्यासोबतच यशस्वी जैस्वाल, सरफराज खानसह काही युवा खेळाडूंनाही संधी मिळू शकते.

भारतीय संघ आधी बांगलादेश, नंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाशी भारत कसोटी मालिका खेळणार आहे. या तीनही मालिकांसाठी बीसीसीआयकडून युवा ब्रिगेडला ध्यानात ठेवत रणनीती आणखी जात आहे. त्यामुळे आता एकेकाळचे स्टार खेळाडू असलेल्या 'या' ५ खेळाडूंना कसोटी संघात पुनरागमन करणे जवळपास अशक्यच असणार आहे.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा जवळपास दीड वर्ष बाहेर राहिल्यानंतर गेल्या वर्षी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात संघात आला होता. पण त्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळालेली नाही.

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने गेल्या वर्षी WTCच्या अंतिम सामन्यात भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्या सामन्यात पुजाराने ४१ धावा केल्या. त्यानंतर त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले.

उमेश यादव (Umesh Yadav) हा वेगवान गोलंदाज अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. उमेशने भारताकडून शेवटचा सामना जून २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याला धोनीच्या निवृत्तीनंतर खूप संधी मिळाल्या. पण त्याला संधीचे सोने करता आले नाही. साहाने शेवटचा सामना २०२१मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही.

वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा एकेकाळी कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य होता, पण आता त्याची कारकीर्द जवळपास संपत आली आहे. अनेक नव्या दमाच्या खेळाडूंमुळे त्याला संधी मिळणे कठीणच आहे.