मुस्लीम मित्राच्या बहिणीशी प्रेम, सर्वांचा विरोध अन् मग... अजित आगरकरची 'फिल्मी लव्ह स्टोरी'

फातिमा भावासोबत क्रिकेटचे सामने पाहायला यायची त्यावेळी दोघांची ओळख झाली

Ajit Agarkar love story with Fatima Ghadially: प्रेमासमोर धर्माची कोणतीही भिंत उभी राहू शकत नाही असं म्हणतात. या गोष्टी जरी फिल्मी वाटत असल्या तरी अशा अनेक प्रेमकहाण्या आहेत, ज्या खऱ्याही आहेत. अशीच एक प्रेमकहाणी आहे टीम इंडियाचा नवा चीफ सिलेक्टर माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरची.

अजित आगरकरला नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आले. बीसीसीआयने याबद्दलची घोषणा केली. त्यामुळे आता आगामी काळासाठी अजित आगरकर भारताचा संघ निवडणार आहे.

अजित आगरकरचं क्रिकेट करियर चर्चेत होतंच, पण त्यासोबतच त्याची प्रेमकहाणीही चांगलीच चर्चिली जाते. क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये अशा अनेक प्रेमकथा आहेत ज्यांनी वय आणि धर्माची बंधने तोडून लग्न केले. त्यातही अजित आगरकरची कहाणी बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे.

होय, अजित आगरकरने आपल्या मुस्लिम मित्राच्या बहिणीशी लग्न केले. फातिमा गडियाली असे तिचे नाव आहे. अजित आणि फातिमा 2002 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. ही त्या काळची गोष्ट आहे जेव्हा आगकर टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असायचा.

अजित आगरकरची क्रिकेटच्या मैदानावर फातिमाशी मैत्री झाली. खरंतर फातिमा तिच्या भावासोबत क्रिकेट मॅच पाहायला यायची. इथेच दोघांची भेट झाली आणि ही मालिका सुरूच राहिली.

फातिमाचा भाऊ आगरकरचा चांगला मित्र होता. हळूहळू अजित व फातिमा भेटत राहिले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. डेटिंगही करू लागले. दोघांच्याही कुटुंबीयांना हा प्रकार कळताच याला विरोध झाला, मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

घरातील सदस्य आगरकर आणि फातिमाच्या विरोधात होते. आंतरधर्मीय विवाह करण्याचा मुद्दा घरच्यांना पटवून देणं सोपं नव्हतं. या दोघांच्या प्रेमात धर्माची भिंत आड येऊ पाहत होती पण आगरकर आणि फातिमा यांनी जिद्द सोडली नाही.

अखेर त्यांनी घरच्यांची समजूत घातली आणि खूप प्रयत्नानंतर दोघांच्या घरची मंडळी लग्नाला तयार झाली. त्यामुळे २००२ साली अजित आणि फातिमा यांचे लग्न झाले. वर्षभरातच ते आई-बाबाही झाले. त्यांनी त्याचे नाव राज ठेवले आहे.