Cricket Buzz»फोटो गॅलरी »CWG 2022:क्रिकेटमधील 'ही' जोडी भारताला देणार सुवर्ण! उपांत्यफेरीत दोघींनीच झेलला होता निम्मा भारCWG 2022:क्रिकेटमधील 'ही' जोडी भारताला देणार सुवर्ण! उपांत्यफेरीत दोघींनीच झेलला होता निम्मा भार By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 11:43 AMOpen in App1 / 8भारतीय महिला क्रिकेट संघासाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. कारण राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये सुवर्ण पदक पटकावण्यापासून भारताच्या वाघिणी फक्त एक पाऊल दूर आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतील महिला क्रिकेटचा फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज होणार आहे. भारताने आपल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंड संघाला पराभूत करून फायनलमध्ये जागा मिळवली आहे. तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.2 / 8महिला क्रिकेटला पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत स्थान मिळाले आहे. अशा परिस्थितीत दोन्हीही संघ सुवर्ण जिंकून इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरतील. भारतीय संघाला उपकर्णधार स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज या जोडीकडून पुन्हा एकदा शानदार खेळीची अपेक्षा असेल. दोन्ही खेळाडू एक चांगल्या मैत्रिणी असून त्यांच्या खेळीने अनेकवेळा संघाला मोठे विजय मिळाले आहेत. विशेष म्हणजे मानधना आणि रॉड्रिग्ज या जोडीने उपांत्यफेरीत देखील उल्लेखणीय खेळी केली होती. 3 / 8स्मृती मानधनाने इंग्लंडविरूद्धच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात ३२ चेंडूत ६१ धावांची खेळी केली होती. तिने सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत हे दुसरे अर्धशतक झळकावले आहे. अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक झळकावून स्मृती इंग्लिश गोलंदाजांना घाम फोडला. तसेच भारतीय महिलांकडून सर्वाधिक वेगाने अर्धशतक करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. ८ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ६१ धावांची ताबडतोब खेळी केली. याआधी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात देखील स्मृतीने अर्धशतकी खेळी केली होती. 4 / 8भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची धुरा सांभाळणारी जेमिमा रॉड्रिग्जने उपांत्यफेरीत ३१ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. तिने ७ चौकार ठोकून इंग्लंडच्या संघावर दबाव राखून ठेवला. जेमिमाच्या सावध खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १६० धावांचा टप्पा गाठला. दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी चौथ्या बळीसाठी अर्धशतकी भागीदारी नोंदवली. यापूर्वी जेमिमाने बारबाडोसविरूद्धच्या सामन्यात नाबाद अर्धशतक ठोकले होते. 5 / 8 उपांत्यफेरीच्या सामन्यात स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज या जोडीने एकूण १०५ धावा केल्या. म्हणजेच संघाने केलेल्या धावांमधील ६४ टक्के धावा या एकट्या जोडीने केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या फायनलच्या सामन्यात देखील भारतीय संघाला या जोडीकडून अपेक्षा असेल. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला आपल्या सलामीच्या सामन्यात पराभूत केले होते. 6 / 8२६ वर्षीय मराठमोळ्या स्मृती मानधनाचा टी-२० आंतरराष्ट्रीय शानदार विक्रम आहे. आतापर्यंत ९१ सामन्यांमध्ये २,१८६ धावा करणारी मानधना भारतीय संघाची प्रमुख फलंदाज आहे. तिच्या नावावर १६ अर्धशतकांची नोंद आहे. तर तिची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या ८६ एवढी आहे. 7 / 8२१ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्जने ५७ टी-२० सामन्यांमध्ये १,२४० धावा केल्या आहेत. तिच्या नावावर ७ अर्धशतकांची नोंद असून तिची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या ७२ एवढी आहे. तिने २१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांच्या जोरावर ३९४ धावा केल्या आहेत. 8 / 8ऑलराउंडर दीप्ती शर्मा, स्नेह राणा आणि कर्णधार हरमनप्रीत यांच्यावर देखील फायनलच्या सामन्यात सर्वांच्या नजरा असणार आहेत. दीप्तीने आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. त्याचवेळी स्नेह राणाने २ बळी घेत संघाला इंग्लंडविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. तसेच हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications