Asia Cup 2022, IND vs SL : पाकिस्तानकडून हरलो म्हणजे सर्व संपलं, असं नाही! टीम इंडिया अजूनही फायनल गाठू शकते; जाणून घ्या गणित

Asia Cup 2022, IND vs SL : पाकिस्तान व हाँगकाँग यांच्यावर विजय मिळवताना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने चाहत्यांना खूश केले. पण, Super 4 मधील पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकाल पाहायला मिळाला.

Asia Cup 2022, IND vs SL : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील साखळी गटातील दोन्ही सामने जिंकून सुपर ४ मध्ये दणक्यात प्रवेश केला. पाकिस्तान व हाँगकाँग यांच्यावर विजय मिळवताना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने चाहत्यांना खूश केले. पण, Super 4 मधील पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकाल पाहायला मिळाला.

कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने जबरदस्त पलटवार करताना आशिया चषक २०२२ स्पर्धेतील हिशोब १-१ असा बरोबर केला. श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी सुपर ४ मध्ये आपापल्या पहिल्या लढती जिंकून फायनलच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. अफगाणिस्तान व भारत यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचा पुढील प्रवास खडतर झाला आहे. अशात आता दोन्ही संघांना जबरदस्त पुनरागमन करावे लागणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ बाद १८१ धावा केल्या. विराट कोहलीने ६० धावा करताना मोठा हातभार लावला. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी प्रत्येकी २८ धावा केल्या. रिषभ पंत व हार्दिक पांड्या अपयशी ठरले. दीपक हुडाने ठिकठाक खेळ करताना १६ धावा केल्या.

प्रत्युत्तरात बाबर आजम अपयशी ठरल्यानंतर रिझवानने एकहाती खिंड लढवली. त्याने ५१ चेंडूंत ७१धावा केल्या. मोहम्मद नवाजने २० चेंडूंत ४२ धावा करून सामना फिरवला. खुशदिल शाह ( १४*) व आसीफ अली ( १६) यांनी सामन्याचा निकाल लावला. भुवनेश्वर कुमारने १९व्या षटकात दिलेल्या १९ धावा, अर्शदीप सिंगकडून मोक्याच्या क्षणी सोडलेला झेलही निर्णायक ठरला.

सुपर ४ मधील प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार... सुपर ४ मध्ये एकूण ६ लढती होती आणि त्यानंतर जो संघ गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांकावर राहिल त्यांच्यात जेतेपदाचा सामना खेळवला जाईल.

भारताचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. श्रीलंकेविरुद्धचा आजचा सामना भारतासाठी करो व मरो असा आहे... आज भारत हरल्यास त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात येईल आणि श्रीलंका फायनल गाठेल. पण, आज जिंकून अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात ( ८ सप्टेंबर) बाजी मारून भारताला अंतिम फेरी गाठता येणार आहे. त्यामुळे आता भारताला उर्वरीत दोन्ही सामने जिंकावे लागतील.

१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.