डोकेफोडी! IND vs PAK सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारत फायनलमध्ये कसा पोहोचणार?

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातल्या सुपर ४ मधील लढतीतही पावसाने खोडा घातलेला पाहायला मिळतोय...

आशिया चषकातील साखळी फेरीतील IND vs PAK सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यातून बोध घेत सुपर ४ च्या लढतीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण, तरीही हा सामना पावसामुळे झालाच नाही, तर टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहोचेल?

पाकिस्तानने सुपर ४ मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करून २ गुणांची कमाई केली आहे. त्यात काल श्रीलंकेनेही बांगलादेशवर विजय मिळवला अन् २ गुण जमा केले. दोन पराभवामुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करावा लागला, तर दोन्ही संघांना १-१ गुण मिळेल.

याचा अर्थ पाकिस्तानच्या खात्यात दोन सामन्यांनंतर ३ गुण होतील, तर श्रीलंका आणि भारत प्रत्येकी १ सामन्याअंती अनुक्रमे २ व १ गुणांसह शर्यतीत राहतील. भारताला सुपर ४ मध्ये श्रीलंका आणि बांगलादेशचा सामना करायचा आहे. बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया विजय मिळवतील अशी आशा आहे आणि मग त्यांचे ३ गुण होतील.

दुसरीकडे श्रीलंकेला सुपर ४ च्या उर्वरित सामन्यात भारत व पाकिस्तानचा सामना करायचा आहे. यापैकी १ लढत जिंकून श्रीलंका ४ गुणांसह पुढे जाईल. भारताने श्रीलंकेलाही पराभूत केल्यास त्यांचे ५ गुण होतील आणि ते फायनलमध्ये प्रवेश करतील.

पण, भारत श्रीलंकेकडून पराभूत झाल्यास त्यांना ३ गुणांवर समाधानी रहावे लागेल. अशात श्रीलंका आणि पाकिस्तान हा सामना महत्त्वाचा ठरेल. श्रीलंकेने पाकिस्तानला नमवल्यास त्यांचे ४ गुण होतील आणि ते फायनल खेळतील, परंतु पाकिस्तान जिंकल्यास ५ गुणांसह ते फायनलला जातील. अशात भारताला नमवून ४ गुण झालेला श्रीलंका आणि पाकिस्तान अशी फायनल होईल.