Join us  

Asia Cup Afg Vs Pak: पराभवामुळे अफगाणिस्तानचे खेळाडू भावूक; मैदानावरच रडू कोसळलं, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 1:23 PM

Open in App
1 / 6

आशिया चषकात बुधवारी झालेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधील सामन्यात पाकिस्तानने निसटता विजय मिळवला. अखेरच्या षटकापर्यंत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी संघर्ष केला मात्र विजय मिळवण्यात अपयश आले. अखेरच्या षटकात पाकिस्तानच्या नसीम शाहने सलग दोन षटकार मारून पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या पराभवामुळे अफगाणिस्तानचे खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आणि काही खेळाडूंना तर मैदानावरच रडू कोसळले.

2 / 6

पाकिस्तानविरूद्ध अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 129 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाची सुरूवात शानदार झाली होती. मात्र अखेरच्या काही षटकांमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत पाकिस्तानला घाम फोडला. परंतु नसीम शाहच्या शानदार खेळीमुळे अफगाणिस्तानला पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करून आशिया चषकात विजयाची हॅट्रिक लगावली आहे.

3 / 6

सामन्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये बरीच धांदल उडाली आणि वाद देखील झाला. मात्र सामन्यानंतर सामनावीर ठरलेल्या शादाब खानच्या वागण्याने सर्वांचीच मने जिंकली आहेत. त्याने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना मिठी मारली आणि चांगला खेळ दाखवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच शादाबने दाखवलेल्या खेळ भावनेचे सर्वजण कौतुक करत आहेत. अफगाणिस्तानने सलग दोन सामने जिंकून आशिया चषकातील आपल्या अभियानाची सुरूवात केली होती.

4 / 6

अफगाणिस्तानच्या फारुखीने शेवटच्या षटकापूर्वी चांगली गोलंदाजी केली होती. मात्र शेवटच्या षटकात लागोपाठ दोन षटकार मारल्यानंतर तो भावूक झाला आणि मैदानावरच त्याला रडू कोसळले. हे पाहून स्टेडियममध्ये उपस्थित पाकिस्तानी प्रेक्षकांनी देखील टाळ्या वाजवून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. फारुखीच्या शानदार गोलंदाजीमुळेच सामन्यात रंगत आली होती.

5 / 6

मात्र वादामुळे सामन्याला गालबोट देखील लागले. फरीद अहमदने आसिफ अलीचा बळी घेतल्यावर पाकिस्तानी खेळाडूचा ताबा सुटला आणि त्याने मारण्यासाठी बॅट उचलली. बाद झाल्यानंतर आसिफ पॅव्हेलियनमध्ये परतत असताना दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. मात्र पंच आणि खेळाडूंनी केलेल्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. सामना संपल्यानंतर फरीद अहमदला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तोही रडू लागला.

6 / 6

अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली. पराभव झाल्यामुळे अफगाणिस्तानचे सर्वच खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच सोशल मीडियावर #Afghanistanboyswonheart ट्रेंड करत आहे. अफगाणिस्तानच्या या पराभवामुळे त्यांच्यासह भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

टॅग्स :एशिया कप 2022अफगाणिस्तानपाकिस्तानआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App