१३००० धावा ते सर्वोत्तम भागीदारी; विराट कोहली-KL Rahul जोडीने मोडले विक्रम लै भारी

Asia Cup , IND vs PAK : भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या ग्रेट वाटणाऱ्या गोलंदाजांची आज बेक्कार धुलाई केली. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी काल १२१ धावांची भागीदारी करून व्यासपीठ तयार केलं होतं अन् आज विराट कोहली व लोकेश राहुल यांनी शतक झळकावून त्यावर धावांचा पाऊस पाडला. पाकिस्तानविरुद्ध भारताने २ बाद ३५६ धावा चोपल्या.

पाकिस्तानविरुद्घ भारताने वन डेतील सर्वोत्तम धावसंख्या आज उभी केली. २००५ मध्ये विशाखापट्टणम येथे भारताने ९ बाद ३५६ धावा केल्या होत्या. त्याआधी २००४ मध्ये कराची येथे ७ बाद ३४९ आणि मँचेस्टर येथे २०१९ मध्ये ५ बाद ३३६ धावा केल्या होत्या.

विराट कोहलीने ९४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १२२ धावा केल्या आणि लोकेश राहुल १०६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह १११ धावांवर नाबाद राहिला. रोहित शर्मा ( ७६) व शुबमन गिल ( ५८) यांनी अर्धशतकी खेळी केली. वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी ५०+ धावा करण्याची ही चौथी वेळ ठरली.

आजच्या सामन्यापूर्वी २००६ मध्ये रॉबिन उथप्पा ( ८६), राहुल द्रविड ( ६९), युवराज सिंग ( ६३) व सुरेश रैना ( ५३) यांनी इंग्लंडविरुद्ध, २००७मध्ये सौरव गांगुली ( ५९), सचिन तेंडुलकर ( ७१), गौतम गंभीर ( ५१) व युवराज ( ७२) यांनी इंग्लंडविरुद्ध आणि २०१७मध्ये रोहित शर्मा ( ९१), शिखर धवन ( ६८), विराट कोहली ( ८१*) आणि युवराज ( ५३) यांनी पाकिस्तानविरुद्ध असा पराक्रम केला होता.

विराट कोहली व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १९४ चेंडूंत २३३* धावांची भागीदारी केली आणि ही पाकिस्तानविरुद्धची सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी १९९६मध्ये नवज्योत सिद्धू व सचिन तेंडुलकर यांनी २३१ धावांची भागीदारी केली होती. २०१८मध्ये शिखर धवन व रोहित शर्मा यांनी २१० व २००५ मध्ये राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांनी २०१ धावांची भागीदारी केली होती.

विराट कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला. त्याने २६७ इनिंग्जमध्ये वन डे क्रिकेटमध्ये १३००० धावांचा टप्पा ओलांडला. ८, ९, १०, ११ अन् १२ हजार धावांनंतर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३ हजार धावांचा विक्रम विराटच्या नावावर आज नोंदवला गेला. त्याने ४७ शतकं झळकावली आहे.

विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर सर्व फॉरमॅटमध्ये १४ हजार धावांचा टप्पा ओलांडला आणि असा पराक्रम करणारा तो जलद फलंदाज ठरला. तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंगच्या नावावर सर्वाधिक २२८६९ धावा आहेत. पाठोपाठ कुमार संगकारा ( २२०११), केन विलियम्सन ( १४५९१) , राहुल द्रविड ( १४५५५) यांचा क्रमांक येतो.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिगशी ( ११२) बरोबरी केली आहे. या विक्रमात सचिन तेंडुलकर ( १४५) , कुमार संगकारा ( ११८) हे आघाडीवर आहेत.

तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे विराट व राहुल ही तिसरी जोडी ठरली आहे. यापूर्वी राहुल द्रविड व सचिन तेंडुलकर ( वि. केनिया, १९९९) आणि सौरव गांगुली व विराट ( वि. श्रीलंका, २००९) यांनी हा पराक्रम केला आहे.

सचिन तेंडुलकरने २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून वन डे क्रिकेटमध्ये १३००० धावांचा टप्पा ओलांडला होता आणि आज विराटने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावताना हा पराक्रम केला.

विराटने कोलंबो येथे वन डे क्रिकेटमध्ये सलग चौथे शतक आज झळकावले. एकाच मैदानावर वन डे क्रिकेटमध्ये सलग चार शतकं झळकावणारा तो हाशिम आमला ( सुपर स्पोर्ट्स) नंतर दुसरा फलंदाज ठरला.