AUS vs IRE: अफगाणिस्तानने काढली ऑस्ट्रेलियाची विकेट; इंग्लंडला उपांत्य फेरी गाठण्याची सुवर्णसंधी

टी-20 विश्वचषकात यजमान ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा 4 धावांनी पराभव केला आहे. मात्र अफगाणिस्तानने कडवी झुंज देऊन कांगारूच्या संघाच्या अडचणीत मोठी वाढ केली आहे.

आज विश्वचषकात यजमान ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना पार पडला. अटीतटीच्या सामन्यात अखेर यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाने 4 धावांनी विजय मिळवला. राशिद खानने कडवी झुंज देऊन कांगारूच्या संघाला मोठे आव्हान दिले मात्र त्याची झुंज अपयशी ठरली. अखेर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला मात्र अफगाणिस्तानने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे इंग्लंडचा मोठा फायदा झाला. उद्या होणारा इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना उपांत्य फेरीसाठी निर्णायक सामना असणार आहे.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. आरोन फिंचच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी कांगारूच्या डावाची सुरूवात केली मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी यजमान संघावर सुरूवातीपासून दबाव टाकला. वॉर्नर 25 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मिचेल मार्शने 30 चेंडूत 45 धावांची खेळी करून डाव सावरला.

ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत असताना ग्लेन मॅक्सवेलने 32 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी करून अफगाणिस्तानसमोर सन्मानजनक लक्ष्य ठेवले. अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक 3 बळी पटकावले. तर फजलहक फारुकीने 2 बळी घेतले. तर राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.

अफगाणिस्तानच्या संघाचे विश्वचषकातील आव्हान या आधीच संपुष्टात आले होते. मात्र आजच्या सामन्यातील त्यांच्या चमकदार खेळीमुळे यजमान संघ विश्वचषकातून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. विश्वचषकात नेटरनरेटच्या बाबतीत जिवंत राहण्यासाठी अफगाणिस्तानला 106 धावांवर रोखण्याचे आव्हान यजमान संघाच्या गोलंदाजांसमोर होते. मात्र कांगारूचे गोलंदाज अपयशी ठरले.

169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची शानदार सुरूवात झाली होती. सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाझने 17 चेंडूत 30 धावांची खेळी केली. त्याच्यापाठोपाठ इब्राहिम झादरान (26) आणि गुलबदीन नईब (39) धावा करून तंबूत परतला. मात्र कांगारूच्या गोलंदाजांनी कोणत्याच फलंदाजाला जास्त काळ टिकू दिले नाही. अखेरच्या दोन षटकांमध्ये राशिद खानने ताबडतोब खेळी करून कांगारूच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. राशिदने 4 षटकार आणि 3 चौकार ठोकून 23 चेंडूत 48 धावांची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवुड आणि ॲडम झाम्पा यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर केन रिचर्डसनला 1 बळी घेण्यात यश आले.

ऑस्ट्रेलियाने आजचा सामना 100 धावांनी जिंकला असता तर इंग्लंडला श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात 47 धावांनी विजय मिळवावा लागला असता. याशिवाय यजमान संघाने हा सामना 80 धावांनी जिंकल्यास इंग्लंडला 29 धावांनी विजय मिळवण्याचे आव्हान होते. तसेच 50 धावांनी जिंकला असता तर इंग्लंडला 1 धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला असता. मात्र अफगाणिस्तानच्या संघाने कडवी झुंज देऊन सर्व समीकरण चुकीचे ठरवले आहे.

खरं तर आज ऑस्ट्रेलियाचा संघ नियमित कर्णधार आरोन फिंचच्या जागी मैदानात उतरला होता. याशिवाय मिचेल स्टार्कला देखील आज विश्रांती देण्यात आली होती. आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - मॅथ्यू वेड (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, कॅमेरन ग्रीन, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड.

न्यूझीलंडने आयर्लंडचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. अ गटातून न्यूझीलंडचा संघ 7 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यामुळे अ गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी चुरस होईल अशी आशा होती. मात्र अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी कांगारूच्या या आशेवर पाणी टाकले. आता इंग्लंडचा संघ सहज उपांत्य फेरी गाठेल अशी अपेक्षा आहे. कारण इंग्लंडचा आगामी सामना शनिवारी श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. उद्या श्रीलंकेच्या संघाने इंग्लंडला पराभूत केले तर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी गाठेल. त्यामुळे उद्या श्रीलंकेच्या खेळीकडे सर्व जगाचे लक्ष असणार आहे.

ब गटातून भारतीय संघ 6 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारत उपांत्य फेरी गाठणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ब गटातून दुसरा कोणता संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार हे पाहण्याजोगे आहे. कारण पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्याने गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. आताच्या घडीला दक्षिण आफ्रिकेचे 5 तर पाकिस्तानचे 4 गुण आहेत. दोन्हीही संघ प्रत्येकी 1-1 सामना खेळणार आहे.