Ricky Ponting-Virat Kohli: “जर मी टीम इंडियात असतो..,” विराटच्या फॉर्मवर पाँटिंगचं मोठं वक्तव्य

Ricky Ponting-Virat Kohli: सध्या खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या विराट कोहलीबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यानं मोठं वक्तव्य केलं आहे.

Ricky Ponting-Virat Kohli: खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळणार का नाही ? विराट कोहली हा सध्या सर्वांच्याच निशाण्यावर असून हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने उघडपणे विराट कोहलीचा बचाव केला आहे. मी भारतीय संघात असतो तर विराट कोहलीला संघातून कधीच वगळलं नसतं, असं मोठं वक्तव्य रिकी पाँटिंग यानं केलं आहे. आयसीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं विराट कोहलीच्या फॉर्मवर वक्तव्य केलं.

जर तुम्ही वर्ल्ड कप पूर्वीच विराट कोहलीला टीमच्या बाहेर केलं आणि त्याच्या जागी कोणाला संधी मिळाली, तर त्याच्यासाठी गोष्टी सोप्या होतील. परंतु विराट कोहलीसाठी पुनरागमन कठीण होईल, असं तो म्हणाला.

मला अशा टप्प्याबद्दल कल्पना आहे आणि मी जर भारतीय संघात असतो तर विराट सोबतच राहिलो असतो. विराटवरून प्रेशर कमी करावं हा कोच किंवा कर्णधाराच्या रूपात माझआ प्रयत्न असता. जेणेकरून त्यानं गोष्टी एन्जॉय करता आल्या असत्या आणि त्यानं धावाही केल्या असत्या, असंही रिकी पाँटिंगनं नमूद केलं.

विराट कोहलीच्या फॉर्मवर रिकी पाँटिंग म्हणाला की, जर मी विरोधी संघाचा कर्णधार असतो तर मला भारतीय संघाची भीती वाटेल कारण विराट कोहली संघात आहे. कदाचित तो माझ्या संघात नाही ही माझ्यासाठी चिंतेची बाब ठरली असती. मला माहित आहे की आता त्याच्यासाठी हे कठीण झाले आहे, परंतु प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत असे घडते. गोलंदाज असो की फलंदाज, कधी ना कधी त्याला अशा टप्प्याचा सामना करावा लागतो.

रिकी पाँटिंगपूर्वी रोहित शर्मा, सुनील गावस्कर, बाबर आझम, जोस बटलर यांच्यासह अनेक दिग्गजांनी विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे. विराट कोहलीने अलीकडेच इंग्लंडविरुद्ध टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळली. सध्या विराट एका महिन्याच्या ब्रेकवर असून वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो टीम इंडियासोबत नसेल.

विराट कोहलीला गेली अडीच वर्षे शतक झळकावता आलेले नाही, अलीकडच्या काळात त्याला खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच त्याला कसोटी आणि नंतर टी-20 संघातून बाहेर काढण्याबाबत चर्चांना उधाण आलं होतं.