ऑस्ट्रेलियाने अडीच दिवसात कसोटी जिंकली, टीम इंडियाची धाकधुक वाढली; इंग्लंडला संधी मिळाली

AUS vs WI 1st Test : ऑस्ट्रेलियाने एडिलेड येथील वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी अडीच दिवसांत जिंकली. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील १८८ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने २८३ धावा केल्या. विंडीजचा दुसरा डाव १२० धावांवर गडगडल्याने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६ धावांचे माफक लक्ष्य होते. ऑसींनी १० विकेट्स राखून हे लक्ष्य सहज पार करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

पाकिस्तानविरुद्ध ३-० अशा कसोटी मालिका विजयानंतर ऑस्ट्रेलियाने विंडीजविरुद्धच्या मालिकेची सुरुवातही विजयाने केली. पण, ऑस्ट्रेलियाच्या विजयाने टीम इंडियाची धाकधुक वाढली आहे आणि इंग्लंडला संधी मिळाली आहे.

भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताची ही तिसरी कसोटी मालिका आहे आणि घरच्या मैदानावरील पहिलीच... २०१२ पासून भारतीय संघ घरच्या मैदानावर अपराजित राहिला आहे.

ऑस्ट्रेलियाने एडिलेड कसोटी जिंकून WTC मध्ये ट्विस्ट आणला आहे. ऑस्ट्रेलियाने हा विजय मिळवून WTC 2023-25 च्या गुणतालिकेतील आपली अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. ते आता ९ सामन्यांत ६६ गुणांसह आघाडीवर आहेत आणि त्यांची टक्केवारी ही ६६.११ अशी झाली आहे.

ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्यातली दुसरी कसोटी २५ जानेवारीपासून गॅबा येथे होणार आहे आणि १९८८ पासून आतापर्यंत ते येथे केवळ एकच कसोटी हरले आहेत. जर पॅट कमिन्सच्या संघाही दुसरी कसोटी जिंकल्यास त्यांचे गुण ७८ होतील आणि टक्केवारी ६५ इतकी होईल.

तेच भारतीय संघ ४ सामन्यांत दोन विजयासह तालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित अँड कंपनीला जर तालिकेत अव्वल स्थान पटकावयचे असेल तर त्यांना इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ५-० अशी जिंकावी लागेल. या निकालानंतर त्यांचे ८६ गुण होतील, परंतु त्यांची टक्केवारी ७९.६ इतकी होईल.

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांची टक्केवारी ही ५० इतकी आहे. पुढील महिन्यात हे दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत. जर इंग्लंडने २०१२ चा कित्ता गिरवताना भारताला पराभूत केल्यास आणि दुसरीकडे दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंड यांच्यापैकी कुणीही क्लीन स्वीप मिळवल्यास भारतीय संघ अडचणीत येऊ शकतो.