Shane Warne Death Case: कोण आहेत परशुराम पांडे? ज्यांना मृत्यूच्या फक्त 4 तास आधीच भेटला होता शेन वॉर्न

आता शेन वॉर्नच्या शेवटच्या काही क्षणांसंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. यातच एका व्यक्तीसंदर्भात एक नवीन गोष्ट समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे ४ मार्चला थायलंडमध्ये निधन झाले. शेन वॉर्न थायलंडमध्ये सुट्ट्यांवर गेला होता, तेथेच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांना कसल्याही प्रकारची गडबड आढळून आलेली नाही. मात्र असे असले तरी, आता शेन वॉर्नच्या शेवटच्या काही क्षणांसंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. यातच एका व्यक्तीसंदर्भात एक नवीन गोष्ट समोर आली आहे.

शेन वॉर्नला शेवटचं जिवंत पाहणाऱ्या लोकांमध्ये एक 44 वर्षीय परशुराम पांडे यांच्या नावाचाही समावेश आहे. परशुराम पांडे यांनी मृत्यूच्या काही तास आधीच शेन वॉर्नची भेट घेतली होती. ते थायलंडमध्ये शेन वॉर्न राहत होता त्याच रिसॉर्टजवळ टेलरचे दुकान चालवतात.

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, 4 मार्चला दुपारी एक वाजताच्या सुमारास शेन वॉर्न Brioni tailors शॉपवर गेला होता. परशुराम पांडेंकडे तो यापूर्वीही पोहोचला होता. वर्ष 2019 मध्ये त्याने येथून जवळपास 10 सूट विकत घेतले होते.

परशुराम पांडे यांनी डेलीमेलला सांगितल्यानुसार, जेव्हा शेन वॉर्न आला होता, तेव्हा अत्यंत आनंदी होता. कारण तो बऱ्याच दिवसांनंतर थायलंडला आला होता. शेन वॉर्न दुकानावर पोहोचला तेव्हा त्याने परशुराम पांडे यांची गळाभेटही घेतली होती. मात्र, त्यानंतर चार तासांनीच शेन वॉर्नचे निधन झाल्याचे समोर आले.

परशुराम पांडे सांगतात की, शेन वॉर्न एक उत्तम ग्राहक होता आणि मीदेखील त्याचा मोठा चाहता होतो. शेन वॉर्न ज्या मित्रांसोबत येथे थांबलेला होता, त्यांपैकी एका मित्रानेही येथून सूट बुक केले होते. शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनाने परशुराम पांडेलाही धक्का बसला आहे.

शेन वॉर्न थायलंड येथील व्हिलामध्ये थांबलेला होता. येथेच एका रूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. शेन वॉर्नला हार्ट अॅटॅक आला होता. यानंतर त्याला सीपीआर देण्यात आला, मात्र, त्याचा जीव वाचू शकला नाही. 52 वर्षीय शेन वॉर्न एक दिवस आधीच आपल्या काही मित्रांसोबत थायलंडला आला होता.

थायलंड पोलिसांनी शेन वॉर्नच्या मृत्यूत कसल्याही प्रकारची गडबड नाही, असे म्हटले आहे. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही समोर आले आहे. त्याचे पार्थिव लवकरच ऑस्ट्रेलियाला पाठविले जाईल.