Join us  

'IPL मध्ये मिळणारा पैसा पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरोधात आक्रमक खेळत नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 3:57 PM

Open in App
1 / 10

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी आयपीएल स्पर्धेबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. खेळाडू आता आपल्या देशापेक्षा आयपीएलमध्ये खेळणं जास्त पसंत करू लागले आहेत, असं रमीज राजा म्हणाले.

2 / 10

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंबाबत देखील रमीज राजा यांनी मोठं विधान केलं आहे. आयपीएलमध्ये मिळणारा पैसा पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी आपल्या डीएनएमध्ये बदलच केला आहे, असा टोला रमीज राजा यांनी लगावला आहे.

3 / 10

एआरवाय न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलमध्ये मिळणारा पैसा पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी आता भारताविरुद्ध आपली भूमिका बदलली आहे. आता ते भारताविरुद्ध आक्रमक पद्धतीनं खेळत नाहीत, असा आरोप रमीज राजा यांनी केला आहे.

4 / 10

'ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी पैशांसाठी आपला डीएनए बदलला आहे. भारतीय संघाविरोधात आक्रमकपणा न दाखवता खेळणं आता त्यांना जास्त चांगलं वाटू लागलं आहे. आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर दबाव वाढू लागला आहे. आयपीएलमधील करार टिकून राहावा यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध चांगली कामगिरी करत नाहीत. कारण त्यांना आयपीएलमधून जास्त पैसे मिळतात', असं रमीज राजा म्हणाले.

5 / 10

नुकतंच न्यूझीलंड संघानं सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमधून ऐनवेळी मायदेशी परतण्याचा निर्णय घेत पाकिस्तानला धक्का दिला होता. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानंही ऑक्टोबरमध्ये नियोजित असलेला पाकिस्तान दौरा रद्द केला आहे.

6 / 10

न्यूझीलंड आणि इंग्लंडनं दिलेल्या धक्क्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा चांगलाच संताप झाला आहे. त्यात पीसीबीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीज राजा यांनी बेछुट आरोपांची मालिकाच सुरू केली आहे.

7 / 10

रमीज राजा यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं होतं. याआधी आमचा भारत हा केवळ एकच शत्रु होता. त्यात आता इंग्लंड आणि न्यूझीलंडचीही भर पडली आहे. वर्ल्डकपमध्ये आम्ही याचा बदला घेऊ, असं विधान रमीज राजा यांनी केलं होतं.

8 / 10

२००९ साली पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघावर लाहोर येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर बंदी घालण्यात आली होती.

9 / 10

त्यानंतर थेट आता झिम्बाब्वे, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा दौरा केला होता. पण इतर अनेक देश आजही पाकिस्तान दौरा टाळत आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची क्रिकेट विश्वात चांगलीच नाचक्की झाली आहे.

10 / 10

रमीज राजा यांनी आयसीसीकडे न्यूझीलंड आणि इंग्लंडनं रद्द केलेल्या दौऱ्याचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचंही सांगितलं आहे. तसंच न्यूझीलंडकडून भरपाई घेणार असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :आयपीएल २०२१पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App