IPL 2021: आवेश खानच्या घातक यॉर्कर मागचं गुपीत अखेर उघड; शूज अन् बॉटलशी अनोखं कनेक्शन!

IPL 2021: आयपीएलमध्ये भारतीय गोलंदाजांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दमदार कामगिरीच्या जोरावर प्रत्येक युवा गोलंदाज आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवताना दिसत आहे. यातच दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज आवेश खान याची जोरदार चर्चा आहे. त्याच्या अचूक टप्प्यातील गोलंदाजीचं रहस्य आता समोर आलं आहे.

आयपीएलच्या यंदाच्या पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत भारतीय गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळत आहे. यात दिल्ली कॅपिटल्सचा युवा गोलंदाज आवेश खान यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पर्पल कॅपच्या स्पर्धेत आवेश खान टॉप-५ गोलंदाजांमध्ये आहे. अचूक टप्प्यातील मारा आणि गोलंदाजीतील हुशारी यानं आवेश खान यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

जसप्रीत बुमराहच्या यॉर्करचा जसा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज धसका घेतात. त्याच पद्धतीनं आता आवेश खानचे घातक यॉर्कर फलंदाजांसाठी मोठं संकट ठरू लागले आहेत. आवेश खाननं अचूक टप्प्यातील यॉर्करमध्ये प्राविण्य कसं मिळवलं यामागचं गुपीत त्यानं उघड केलं आहे.

आवेश खान नेट्समध्ये घेत असलेली अपार मेहनत हे जरी यामागचं खरं रहस्य असलं तरी त्यासाठी वापरण्यात येत असलेली क्लृप्ती त्यानं सांगितली आहे.

फलंदाजाच्या बरोब्बर पायात चेंडू टाकण्यामागचा अचूकपणा गोलंदाजीत येण्यासाठी आवेश खान नेट्समध्ये एक बॉटल आणि शूजचा वापर करतो. स्टम्पजवळ जिथं फलंदाज उभा असतो तिथं बूट ठेवून चेंडू थेट बुटाचा वेध घेईल याचा तासंतास सराव तो करतो.

"मी जेव्हा नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करतो. त्यावेळी १० ते १२ यॉर्कर चेंडू आवर्जुन टाकतो. यॉर्कर चेंडू टाकणं एक अशी कला आहे की जी तुम्हाला येण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. मी एक बॉटल किंवा शूज ठेवून तासंतास यॉर्कर चेंडू टाकण्याचा सराव करतो. ज्या ज्या वेळी बॉटल किंवा शूजला चेंडू लागतो त्या त्यावेळी माझ्यातील आत्मविश्वास वाढतो", असं आवेश खान म्हणाला.

यॉर्कर एक अस्त्र आहे की जे ट्वेन्टी-२० सारख्या सामन्यांमध्ये अतिशय उपयोगी ठरतं. या चेंडूच्या माध्यमातून तुम्ही फलंदाजाला वेसण घालू शकता. याशिवाय खेळपट्टीवर आलेल्या नव्या फलंदाजाला पहिलाच चेंडू यॉर्कर येईल याचाही अंदाज नसतो, असंही आवेश खान म्हणाला.

आयपीएलच्या यंदाच्या पर्वात आवेश खान यानं ११ सामन्यांमध्ये १८ विकेट्स मिळवल्या आहेत. आवेश खानसोबत दिल्लीच्या संघात एन्रीक नॉर्खिया आणि कगिसो रबाडासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्यासोबत राहून आवेश खानच्या गोलंदाजीत बरीच सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे.

"मला नॉर्खिया आणि रबाडा या दोघांकडून खूप काही शिकायला मिळतं. या दोघांपैकी जो कुणी पहिलं षटक टाकतो त्याच्याशी मी जाऊन खेळपट्टीबाबत नेहमी चर्चा करतो. खेळपट्टी कशी आहे. कोणत्या चेंडूंवर भर द्यायला हवा याच्या टिप्स घेतो. कोणत्या फलंदाजाला कोणत्या प्रकारचा चेंडू टाकायला हवा याचाही सल्ला घेतो", असं आवेश खान म्हणाला.

Read in English