Asia Cup 2022 सुरू होण्याआधी बाबर आजमची धाकधुक वाढली, ICCने खबरच तशी दिली!

Asia Cup 2022 स्पर्धा २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान या लढतीने आशिया चषक २०२२ चा शुभारंभ होत असला तरी २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीची सर्वांना प्रतीक्षा आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर उभय संघ प्रथमच एकमेकांसमोर येणार आहेत.

विराट कोहली, लोकेश राहुल हे दोन स्टार फलंदाज आशिया चषक स्पर्धेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा फॉर्म पाहता यंदा पाकिस्तानला विजय मिळवणे अवघड जाणार, असे जाणकारांचे मत आहे. बाबर आजमच्या ( Babar Azam) नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे.

पण, आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच बाबर आजमची धाकधुक वाढली आहे. आयसीसीने बुधवारी ट्वेंटी-२० क्रिकेटमधील फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. त्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याने त्याचे अव्वल स्थान कायम राखले आहे, परंतु दुसऱ्या क्रमांकावर असलेला सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याचा चढता आलेख पाहून बाबरचं टेंशन वाढलं आहे.

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका ४-१ अशी जिंकली. या मालिकेत सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी करताना ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. बाबरच्या खात्यात ८१८ रेटिंग पॉइंट असले तरी सूर्यकुमार ८०५ रेटिंग पॉइंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील दोन्ही खेळाडूंची कामगिरी या क्रमवारीत बराच उलटफेर करू शकते.

विंडीजविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमारने सर्वाधिक १३५ धावा केल्या होत्या आणि त्याला पाचव्या सामन्यात बाबरला मागे टाकण्याची संधी होती. पण, त्याने संधी गमावली आता त्याला आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यात ही संधी पुन्हा मिळणार आहे.

भारताचा श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांनी ट्वेंटी-२० क्रमवारीत चांगली झेप घेतली आहे. अय्यरने पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतक झळकावले होते आणि त्यामुळे तो ६ स्थानांच्या सुधारणेसह १९व्या क्रमांकावर आला आहे. रिषभने या मालिकेत ११५ धावा केल्या आणि तो ७ स्थानांच्या सुधारणेसह ५९व्या क्रमांकावर आला आहे.

गोलंदाजांमध्ये रवी बिश्नोईने ५० स्थानांची झेप घेत ४४वे क्रमांक पटकावले आहे. आवेश खान, अक्षर पटेल व कुलदीप यादव यांनीही आपापली क्रमवारी सुधारली आहे, परंतु भुवनेश्वर कुमारची एक क्रमांकाने घसरण झाली आहे.