गिरे तो भी टांग ऊपर! ICC स्पर्धांमधील अपयशानंतरही BCCI करणार भारतीय खेळाडूंच्या पगारात बंपर हाईक

भारतीय संघाला सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये अपयश आले. असे असले तरी BCCI आता भारतीय खेळाडूंच्या पगारात बक्कळ वाढ करणार आहे.

भारतीय संघाला सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये अपयश आले. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही संघाला पोहोचता आले नव्हते. त्यात बांगलादेशकडून वन डे मालिकेतही भारताला हार मानावी लागली. असे असले तरी BCCI आता भारतीय खेळाडूंच्या पगारात बक्कळ वाढ करणार आहे.

रोहित शर्मा अँड कंपनीला ५ वर्षांनंतर केंद्रीय करारांमध्ये वाढ मिळू शकते. BCCI ने आयपीएल मीडिया अधिकारांमधून बक्कळ कमाई केली आहे आणि त्याचा खेळाडूंना काही फायदा होणार आहे. BCCI २०२२-२३ हंगामासाठी वार्षिक रिटेनरशिपमध्ये १० ते २० टक्के पगारवाढ करण्याचा विचार करत आहे.

मागील चार वर्षांत अधिक क्रिकेट खेळूनही आणि गेल्या वर्षी दोन नवीन आयपीएल फ्रँचायझीच्या विक्रीतून मोठी रक्कम कमावल्यानंतरही बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना कोणतीही पगारवाढ दिली नव्हती.

बीसीसीआय आपल्या वार्षिक केंद्रीय करारातून जानेवारी २०२२ पासून कसोटी संघातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) आणि इशांत शर्मा ( Ishant Sharma) या कसोटी स्पेशालिस्ट खेळाडूंना काढून टाकण्याची शक्यता आहे, तर २०२२-२३ हंगामाची नव्या केंद्रिय करारात शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना पदोन्नती मिळू शकते.

A+ आणि A या दोन श्रेणी आहेत जेथे खेळाडू एकतर सर्व-स्वरूपात नियमित असतात किंवा किमान कसोटीमध्ये व मर्यादित षटकांच्या दोनपैकी एक फॉरमॅटमध्ये असतात. B गटातील खेळाडू किमान दोन फॉरमॅट खेळतो, तर C हा प्रामुख्याने एकाच फॉरमॅटमध्ये खेळतो.

सूर्यकुमार यादव सध्या C गटात आहे आणि मागील वर्षभरातील त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. त्याला B गटात प्रमोशन दिले जाऊ शकते किंवा A गटातही तो येऊ शकतो. आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत तो सध्या नंबर एकचा फलंदाज आहे. गिल कसोटी व वन डे क्रिकेटचा सदस्य आहे आणि त्यालाही C गटातून B गटात प्रमोशन दिले जाऊ शकते.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “ शेवटची रिटेनरशिप वाढ COA दरम्यान झाली होती. पण आपल्याला कोविडचा हिशोब द्यावा लागेल. यावेळी, आम्ही सुमारे १०ते २० % वाढीची चर्चा करत आहोत. मात्र अद्याप काहीही ठरलेले नाही. आमचा निर्णय बैठकीत घेतला जाईल.''

२०१७-१८ च्या हंगामात खेळाडूंच्या पगारात शेवटची वाढ झाली होती. विनोद राय यांच्या नेतृत्वाखालील CoA ने ग्रेड A+ स्लॅब सादर केला होता आणि त्यानुसार बीसीसीआयने ७ कोटी, ५ कोटी, ३ कोटी आणि १ कोटी असे चार स्लॅब कायम ठेवले होते. पण वार्षिक पगाराच्या बाबतीत इंग्लंडचे खेळाडू भारतीय खेळाडूंपेक्षा जास्त कमावत आहेत.

त्यामुळे आता ७ कोटी रुपयांचा सर्वोच्च श्रेणीचा स्लॅब १० कोटी रुपये होण्याची चर्चा आहे. ५ कोटी रुपयांचा स्लॅब ७ कोटी रुपये होण्याची शक्यता आहे आणि बी आणि सी श्रेणीतील खेळाडू अनुक्रमे ५ आणि ३ कोटी रुपये कमवू शकतात.