ICC Chairman : जय शाह ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष; पदासह 'मान'धनही वाढलं, जाणून घ्या सर्वकाही

jay shah icc chairman salary : ३५ वर्षीय जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

बीसीसीआय सचिव ३५ वर्षीय जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. १ डिसेंबर २०२४ पासून ते आपल्या या नवीन पदाचा कारभार सांभाळतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्याने शाह यांच्या पदासह जबाबदारीतही मोठी वाढ झाली आहे. (Jay Shah, ICC Chairman Salary) बीसीसीआयमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा पगार निश्चित नसतो. शाह हे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे बॉस असतील.

ते जेव्हा आयसीसीची बैठक अथवा इतर कोणत्या कारणास्तव परदेशी दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांना प्रति दिन ८२ हजार रूपये एवढा भत्ता दिला जातो. इतकेच नाही तर वरिष्ठ अधिकारी पदेशात प्रवास करतात तेव्हा त्यांच्या सर्व सुविधांचीही काळजी बोर्ड घेते.

खरे तर विमानाने प्रवास करताना त्यांना नेहमी प्रथम श्रेणी सुविधा पुरविल्या जातात. परदेशी दौऱ्यांप्रमाणे जेव्हा ते मायदेशात बैठकांना जातात तेव्हा त्यांना दररोज ४० हजार रुपये भत्ता दिला जातो.

याशिवाय बैठकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्यास त्यांना दररोज ३० हजार रुपये भत्ता मिळतो. त्यांनी तिथे हॉटेल बुक केल्यास सर्व खर्च क्रिकेट बोर्डाकडून केला जातो.

एकूणच बीसीसीआयमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना निश्चित पगार दिला जात नसला तरी त्यांना भत्ता दिला जातो. त्याचप्रमाणे आयसीसीमध्ये देखील मोठ्या पदांवर असलेल्या लोकांना कोणतेही निश्चित वेतन नसते. उलट त्यांना भत्ता आणि त्यांचा प्रवास, बैठका इत्यादींचा खर्च दिला जातो.

विशेष म्हणजे आजपर्यंत आयसीसीने आपल्या अधिकाऱ्यांना प्रवास, बैठका किंवा इतर सुविधांसाठी किती पैसे दिले आहेत हे उघड केलेले नाही.

ICC अध्यक्षपदासाठी उमेदवाराकडे नेतृत्व कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाप्रती समर्पण असणे आवश्यक असते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असतो. हा कार्यकाळ दोनदा वाढवला जाऊ शकतो. अशा प्रकारे एक व्यक्ती एकूण ६ वर्षे ICC चे अध्यक्ष राहू शकते. अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इतर कोणी अर्ज न केल्याने जय शाह यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला.

विशेष बाब म्हणजे १६ पैकी १५ सदस्यांचा शाह यांना पाठिंबा होता. पण, शाह यांची बिनविरोध निवड झाल्याने आयसीसीला सर्वात तरुण अध्यक्ष मिळाला आहे.