वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी रिषभ पंतही शॉर्टलिस्ट; BCCI च्या यादीतील 'ते' २० खेळाडू कोण?

BCCI shortlists 20 players for ICC World Cup 2023 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) रविवारी आढावा बैठक मुंबईत पार पडली. बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा हा देखील एक विषय होता.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) रविवारी आढावा बैठक मुंबईत पार पडली. बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा हा देखील एक विषय होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप २०२३ साठी BCCI ने २० खेळाडूंची नावं शॉर्टलिस्ट केली आहेत आणि हे खेळाडू पुढील ३५ वन डे सामन्यांमध्ये आलटून पालटून खेळतील.

बीसीसीआयने अद्याप या २० खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत, परंतु लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. पण, भारतीय चाहत्यांच्या मनात प्रश्न उपस्थित आहेच आणि तो म्हणजे बीसीसीआयने निवडलेल्या २० खेळाडू कोण आहेत. चला जाणून घेऊया कोण आहेत ते २० संभाव्य खेळाडू जे भारताला वर्ल्ड कप जिंकून देतील.

फलंदाज : कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे या २० खेळाडूंमध्ये असतील. कर्णधारपदासह फलंदाजीतही चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी रोहितवर असेल. त्याचवेळी विराट आणि श्रेयस यांनी गेल्या वर्षी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवला होता. सूर्यकुमारकडूनही ट्वेंटी-२० क्रिकेटप्रमाणेच वन डेत कामगिरीची अपेक्षा असेल. यासोबतच सलामीवीर शुभमन गिलचाही या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.

यष्टिरक्षक : यष्टिरक्षक फलंदाजांबद्दल बोलायचे तर, लोकेश राहुल, संजू सॅमसन आणि इशान किशन या यादीत असू शकतात. अपघातामुळे रिषभ पंत सध्या रुग्णालयात दाखल असून तो अनेक महिने संघाबाहेर असण्याची शक्यता आहे. पंतला पुनरागमन करता आले तर संजू सॅमसनचे स्थान धोक्यात येऊ शकते.

अष्टपैलू : अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे तर, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हे स्वाभाविकपणे असावेत. रवींद्र जडेजा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर असला तरी येत्या काही दिवसांत तो मैदानात दिसला. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरलाही या यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे.

फिरकीपटू : कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांचा फिरकी गोलंदाजांमध्ये समावेश केला जाऊ शकतो. वर्ल्ड कप भारतीय भूमीवर होणार असल्याने कुलचा (कुलदीप-चहल) संयोजन खूप प्रभावी ठरू शकते. भारतीय संघ व्यवस्थापन आतापासून दोन्ही खेळाडूंना खेळासाठी वेळ देऊ इच्छित आहे.

वेगवान गोलंदाज: जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, उम्रान मलिक, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांना वेगवान गोलंदाजीत स्थान मिळू शकते. बुमराह सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे पण तो लवकरच खेळात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

२० संभाव्य खेळाडूंची यादीः रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), लोकेश राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, उम्रान मलिक, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर.