Join us  

IPL 2021 Suspended, Big News: आयपीएलचा उर्वरित टप्पा यावर्षी होणे अवघड, चेअरमन ब्रिजेश पटेल काय म्हणाले घ्या जाणून!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 7:35 PM

Open in App
1 / 9

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं तयार केलेला बायो बबल भेदला अन् तातडीनं आयपीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. आयपीएलच्या १४व्या पर्वातील ३० सामने झाले आहेत आणि उर्वरित ३० सामने आता केव्हा व कुठे होतील, याबाबत सर्वांची उत्सुकता आता ताणली गेली आहे.

2 / 9

कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातही कोरोना धडकला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान सहा यांना कोरोनाची लागण झाली आहे.

3 / 9

याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशातील सध्याची कोरोना परिस्थिती पाहता, उर्वरित स्पर्धा लवकर सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे. पण, काही फ्रँचायझींमध्ये त्यावरून दोन गट पडल्याचे चित्र समोर येत आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुल्का यांनी आयपीएल स्पर्धा रद्द करत असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

4 / 9

राजीव शुक्ला यांनी आयपीएल रद्द की स्थगित याबाबत निर्माण झालेला संभ्रमही दूर केला. ही स्पर्धा रद्द नव्हे तर स्थगित झालेली आहे. त्यामुळे क्रिकेट विंडो उपलब्ध होईल, तेव्हा उर्वरित सामन्यांचे आयोजन केले जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय ही स्थगिती एक-दोन आठवड्यांची असेल आणि स्पर्धा सुरू होईल, या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. एवढ्या कमी वेळेत पुन्हा स्पर्धा सुरू होऊ शकत नाही.

5 / 9

आता बीसीसीआय व आयपीएलसमोर मोठं आव्हान आहे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकाचे. आयपीएल २०२१चा अंतिम सामना ३० मे रोजी होणार होता आणि त्यानंतर आठवड्याच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद ( १८ ते २२ जून) स्पर्धेसाठी लंडनला रवाना होणार होती.

6 / 9

मे महिन्यात न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे ( २५ मे ते १४ जून). त्यापाठोपाठ आयर्लंडचा नेदरलँड्स ( ४ ते ९ जून) दौरा, श्रीलंकेचा इंग्लंड दौरा ( १८ जून ते ४ जुलै), पाकिस्तानचा इंग्लंड दौरा ( ८ ते २० जुलै), दक्षिण आफ्रिकेचा आयर्लंड ( ११ ते २५ जुलै) दौरा होणार आहे.

7 / 9

४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. त्यानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे आणि मग तिथून ट्वेंट-२० वर्ल्ड कप साठी भारतात येईल. ऑक्टोबर - नोव्हेंबर या कालावधीत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे.

8 / 9

आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी सप्टेंबरच्या विंडोचा विचार करत असल्याची माहिती आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली. पण, इंग्लंड-भारत कसोटी मालिका १४ सप्टेंबरला संपेल आणि त्यानंतर वर्ल्ड कपला सुरुवात होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी आहे. त्या विंडोत आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्याचा विचार सुरू आहे.

9 / 9

पण, असं केल्यास वर्ल्ड कप स्पर्धेसाठी खेळाडू थकलेले असतील आणि त्यासाठी कोणताच संघ तयार होणार नाही. त्यामुळे याही कालावधीत आयपीएलचे उर्वरित सामने शक्य नाहीत. वर्ल्ड कपनंतर आयपीएलसाठी विंडो आहे, पण त्यात परदेशी खेळाडूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१बीसीसीआयसंयुक्त अरब अमिरातीआयसीसी विश्वचषक टी-२०