रोहित, विराट, शुबमनसह १५ खेळाडू IPL 2023 च्या शेवटच्या टप्प्यात खेळण्याची शक्यता कमी; कॅप्टन काय म्हणाला वाचा

भारतीय खेळाडू आता तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर IPL 2023 मध्ये आपापल्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसतील. पण, आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात रोहित, विराट सह १५ खेळाडू खेळताना दिसले नाही तर आश्चर्य वाटायला नको.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित राहिली आणि भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २-१ अशी जिंकली. या निकालाआधी न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर थरारक विजय मिळवून भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ( WTC Final) फायनल खेळण्याचा मार्ग मोकळा केला.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात विराट कोहली व शुभमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने ९ बाद ५७१ धावा करताना ९१ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेड (९०) व मार्नस लाबुसेन यांच्या १३९ धावांची भागीदारीच्या जोरावर २ बाद १७५ धावांवर डाव घोषित केला.

भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नावावर केली. २०१७, २०१८-१९, २०२०-२१ आणि २०२३ मध्ये भारताने ही ट्रॉफी जिंकली. घरच्या मैदानावरील भारताचा हा १६ वा कसोटी मालिका विजय आहे. भारतीय खेळाडू आता तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर IPL 2023 मध्ये आपापल्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसतील. पण, आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात रोहित, विराट सह १५ खेळाडू खेळताना दिसले नाही तर आश्चर्य वाटायला नको.

''भारतीय जलदगती गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. WTC Final मध्ये जे भारतीय गोलंदाज खेळणार आहेत, त्यांना आयपीएल दरम्यान ड्युक चेंडू सरावासाठी दिला जाणार आहे. आयपीएल दरम्यान खेळाडूंच्या वर्कलोडची आम्ही काळजी घेऊ. २१ मे पर्यंत आयपीएलमधून ६ संघ बाद होतील आणि त्या संघातील खेळाडूंना WTC Final च्या तयारीसाठी आधीच लंडनमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असेल. सध्यातरी श्रेयस अय्यरची दुखापत ठिक दिसत नाहीए,''असे रोहितने सामन्यानंतर सांगितले.

आयपीएलची फायनल २८ मे २०२३ ला होणार आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल ७ जून पासून खेळवली जाणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या आणि WTC Final मध्ये भारतीय संघाचे सदस्य असलेल्या खेळाडूंना १० दिवसांचाच ब्रेक मिळणार आहे. दरम्यान, रोहितच्या दाव्यानुसार २१ मे नंतर जे खेळाडू आयपीएलमधून बाद होतील त्यांना WTC Finalच्य तयारीसाठी लंडनला पाठवले जाईल.

बीसीसीआयने आगामी वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन खेळाडूंवरील वर्क लोड हा विषय गांभीर्याने घेतला आहे आणि त्यांनी आयपीएल फ्रँचायझींना तशा सूचनाही केल्या आहेत. भारताने २०१३ पासून आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही आणि WTC Final च्या निमित्ताने ती संधी चालून आली आहे. अशात BCCI रोहित, विराट सह १५ खेळाडू जे WTC Final चे सदस्य आहेत त्यांना आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात विश्रांती घेऊन लंडनला जाण्यास सांगू शकतील.

WTC Final साठी संभाव्य संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, चेतेश्वर पुजारा