शेवटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात झिम्बाव्वेने श्रीलंकेला घरच्या मैदानावरच मात दिली आहे. आज पल्लेकेले येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने श्रीलंकेवर २२ धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने ५० षटकात ३०२ धावा फटकावल्या. प्रत्युत्तरदाखल श्रीलंकेला ९ बाद २८० धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे तीन सामन्याच्या मालिकेत १-१ अशा बरोबरीत आली आहे. तसेच स्पर्धेतील विजेत्याचा निर्णय होणार आहे.
झिम्बाब्वेकडून कर्णधार क्रेग एर्विनने ९८ चेंडूत ९१ धावांची खेळी केली. सिकंदर रजाने ४६ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. पहिल्या वनडेत शतक ठोकणाऱ्या सीन विल्यम्सने ४८ धावा केल्या. विकेटकीपर चकाब्वाने ४७ धावांची खेळी केली.
श्रीलंकेकडून कर्णधार दसून शणाका याने शतकी खेळी केली. त्याने ९४ चेंडूत १०२ धावा फटकावत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. कामिंदू मेंडिस यानेही ५७ केल्या. चमिका करुणारत्ने याने ३४ धावांची खेळी केली.
झिम्बाब्वेकडून टेंडई चटारा आणि ब्लेसिंग मुजरबानी यांनी प्रत्येरी ३ बळी घेतले. श्रीलंकेकडून वँडरसे याने ३ बळी घेतले. या मालिकेतील शेवटचा सामना २१ जानेवारी रोजी खेळवला जाईल.
श्रीलंकेविरुद्ध मिळवलेला झिम्बाब्वेचा हा केवळ बारावा विजय आहे. तर ४५ सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचा पराभव झाला आहे. तर गेल्या चार वर्षांनंतर झिम्बाब्वेने श्रीलंकेवर विजय मिळवला आहे.