क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. भारतात सुरू असलेल्या वन डे विश्वचषकाच्या सुरूवातीला कांगारूंचा संघ अडखळला पण त्यानंतर दमदार पुनरागमन करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाचवेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियासमोर यंदा यजमान भारतीय संघाचे आव्हान असणार आहे. सलग दहा विजय मिळवून टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
टीम इंडिया घरच्या मैदानावर खेळत असल्याने क्राउड महत्त्वाचा फॅक्टर ठरेल. भारतीय संघाला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असेल, पण आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ खेळण्याचा प्रयत्न करू असे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सांगितले. '१,३०,००० प्रेक्षकांसमोर खेळणे हा वेगळा अनुभव असेल, बहुसंख्य चाहते टीम इंडियाच्या बाजूने जल्लोष करतील पण त्यांना शांत करण्यात वेगळीच मजा आहे', असे कमिन्सने प्रेक्षकसंख्येबद्दल बोलताना सांगितले.
रविवारी भारतीय चाहत्यांनी मैदान भरेल यात शंका नाही, पण जे काही असेल त्याचा सामना करायला हवा. आम्हाला चांगला खेळ करून दिवस संपवायचा आहे, असेही कमिन्सने नमूद केले.
ऑस्ट्रेलियाने ८ विजयांसह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे, तर भारतीय संघाने सलग दहा विजय मिळवून अंतिम फेरीचे तिकिट मिळवले.
आयसीसी रिव्ह्यूमध्ये बोलताना कमिन्सने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. संघाच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियन कर्णधाराने म्हटले, 'आमच्यासाठी आनंददायक गोष्टींपैकी एक म्हणजे मला अजूनही वाटत नाही की आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ खेळलो आहे.'
तसेच नेदरलँड्सविरुद्धचा सामना वगळता आम्हाला कोणताही सामना सहजपणे जिंकता आला नाही आणि प्रत्येक विजयासाठी संघर्ष करावा लागला. तिथूनच आम्हाला जिंकण्याचा मार्ग सापडला आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे खेळाडू संघाच्या कठीण काळात उभे राहिले आहे, असेही कमिन्सने सांगितले.
नरेंद्र मोदी स्टेडियमबद्दल बोलताला कमिन्सने सांगितले की, आम्ही खेळतो त्या इतर ठिकाणांपेक्षा या शहरात आणि या ठिकाणी जास्त दव आहे. येथील खेळपट्टीवर पहिली २० षटके कुठे स्विंग होतो असे म्हणणे वेगळे ठरेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहे. वन डे विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
यासाठी खास क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्यात आली असून चाहत्यांना मनोरंजन करण्यासाठी बीसीसीआयने काही कार्यक्रमांचे आयोजन केले. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स हे देखील उद्याचा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजेरी लावणार आहेत.