IPL 2023 : मानलं अजिंक्य रहाणे! KKRची धुलाई करून ५ लाख कमावले; यंदाच्या आयपीएलमध्ये असे प्रथमच घडले

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सने इडन गार्डनवर रविवारी कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला. CSK ने ठेवलेल्या २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना KKRला ८ बाद १८६ धावा करता आल्या.

चेन्नईने ४९ धावांनी हा सामना जिंकून IPL 2023 Point Table मध्ये अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात अजिंक्य रहाणेची ( Ajinkya Rahane) फलंदाजी पाहण्यासारखी होती. या सामन्यातून त्याने ५ लाखांची कमाई केली आणि IPL 2023 मध्ये असे प्रथमच घडले.

ऋतुराज गायकवाड ( ३५) आणि डेव्हॉन कॉनवे ( ५६) यांनी ७३ धावांची भागीदारी करताना CSKला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर अजिंक्य रहाणे व शिवम दुबे या जोडीने ३२ चेंडूंत ८५ धावा चोपल्या. शिवम २१ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला. अजिंक्य २९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ७१ धावांवर नाबाद राहिला.

प्रत्युत्तरात कोलकाताकडून जेसन रॉय व रिंकू सिंग यांनी अर्धशतक झळकावले, परंतु ते विजय मिळवून देऊ शकले नाहीत. जेसन रॉयने २६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावा केल्या. रिंकू ३३ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला.

५० लाख मुळ किमतीत चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेल्या अजिंक्यने संधीचं सोनं करताना आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे आणि काल त्याने २४५ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. त्याच्या फटक्यांमध्ये पाहायला मिळालेली तंत्रशुद्धता क्रिकेट चाहत्यांना प्रेमात पाडणारी होती.

या सामन्यात अजिंक्यला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला. शिवाय स्ट्रायकर ऑफ दी मॅच, गेम चेंजर ऑफ दी मॅच, व्हॅल्यूएबल एसेट ऑफ दी मॅच आणि ऑन दी गो फोर असे प्रत्येकी १ लाख बक्षीस रकमेचे पाच पुरस्कार मिळाले. आयपीएल २०२३ मध्ये एकाच सामन्यात पाच पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.