पश्चाताप नाही!; सुरेश रैनानं मौन सोडलं, IPL 2020मधून माघार घेण्यामागचं खरं कारण सांगितलं

चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) उप कर्णधार सुरेश रैनानं ( Suresh Raina) अचानक इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातून माघार घेत सर्वांना धक्का दिला होता.

आयपीएल २०२०साठी तो संघासोबत यूएईत दाखल तर झाला, परंतु अचानक त्यानं मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामागे कर्णधार महेंद्रसिंग धोनी व संघ व्यवस्थापनासोबत झालेला वाद, कारणीभूत असल्याची चर्चा रंगली.

सुरेश रैनाचा हा निर्णय संघमालक एन श्रीनिवास यांना अजिबात आवडला नाही आणि त्यांनी त्याच्यावर टीका केली. कधीकधी प्रसिद्धीची हवा तुमच्या डोक्यात जाते, असा आरोप त्यांनी केला.

यूएईत राहण्यासाठी दिलेल्या रुमवरून रैना नाराज असल्याची चर्चा होती, पण अशा कोणत्याच चर्चांना CSKच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाला नाही.

पण, त्या दिवसानंतर रैनानं आता प्रथमच त्या निर्णयामागचं खरं कारण सांगितलं. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना रैनानं त्या निर्णयाचा पश्चात्ताप होत नसल्याचेही स्पष्ट केले.

''मला पश्चात्ताप का वाटायला पाहिजे?, मी माझ्या मुलांसोबत वेळ घालवला आणि माझ्या कुटुंबासाठी हा निर्णय घेतला,''असे रैनाने स्पष्ट केले. तो पुढे म्हणाला,''माझ्या कुटुंबासाठी मला परत यायचे होते. पंजाबमध्ये माझ्या आत्या व काकांसोबत घडले, त्यावेळी त्यांना माझी अधिक गरज होती. कोरोना व्हायरसच्या संकटात मी कुटुंबासोबत रहावं, असं पत्नीला वाटत होतं. मी २० वर्ष क्रिकेट खेळतोय, त्यामुळे मी पुनरागमन करेन, याची मला खात्री होती. पण, जेव्हा कुटुंबाला तुमची गरज असते, तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असायला हवं. त्यावेळी तेच योग्य होतं.''

रैनानं चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक ४५२७ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२१मध्ये तो खेळणार की नाही, याबाबत अजूनही अधिकृत वृत्त आलेले नाही.

मुंबई मिररनं काही दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्तानुसार CSK रैनाला त्यांच्या ताफ्यात ठेवण्यासाठी उत्सुक आहेत. पण, याबाबतही अधिकृत काहीच घोषणा झालेली नाही.