Chetan Sharma Sting Operation: टीम इंडियाचे खेळाडू इंजेक्शन घेऊन खेळतात; चेतन शर्मांचा स्टिंग ऑपरेशनमध्ये गौप्यस्फोट

इशान किशनने तिघांचे करिअर बुडविले; स्टिंग ऑपरेशनमध्ये निवड समिती अध्यक्षांचे खुलासे

भारतीय क्रिकेट टीमबाबत खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. हा खुलासा दुसरा तिसरा कोणी नाही तर एकेकाळी टीम इंडियाचे खंदे शिलेदार राहिलेल्या चेतन शर्मा यांनी केला आहे. भारतीय संघातील खेळाडू डोपिंग टेस्टपासून वाचण्यासाठी, फिट दाखविण्यासाठी इंजेक्शन घेत असल्याचा दावा केला आहे.

टीम इंडियामध्ये पहिल्या नंबरपासून ते अकराव्या खेळाडूपर्यंत अनेक जण इच्छुक असतात. काहींनाच संधी मिळते, तर अनेकांची अख्खी कारकीर्द संधीची वाट पाहण्यात संपून जाते. एवढा मोठ्या स्पर्धेत जर कोणाला टीम इंडियात जागा मिळालीच तर छोट्या मोठ्या दुखापतींमुळे त्याला टीम बाहेर व्हायचे नसते. यामुळे हे खेळाडू १०० टक्के फिट दाखविण्यासाठी इंजेक्शन घेत असल्याचा दावा चेतन शर्मा यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे चेतन शर्मा हे बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्षही आहेत.

सर्वच खेळाडूंना स्टार व्हायचे असते. सर्वांनाच सुपरस्टार कोहली बनायचे असते. कोणीतरी हे जाणूनबुजून करत आहे...कोणी करत नाही....असे काही खेळाडू आहेत जे ते म्हणतात की मला खेळायचे आहे… आम्ही त्यांना बाजुला करतो. काही हरकत नाही कारण त्याला माहितीय की जर तो बाजुला झाला तर कोणीतरी दुसरा येतोय.., असे शर्मा म्हणाले.

खेळाडूंवर संघातील जागा जाण्याचा दबाव आहे. हेच दडपण असलेले खेळाडू इंजेक्शनच्या खेळातही सहभागी असतील. आता जसा तो (ऋषभ पंत) जखमी झाला... इशान किशन आत आला, आता ईशान किशन किती जणांना बुडविणार...

पंत जखमी होताच शिखर धवन अक्षरशः संघाबाहेर गेला. संजू सॅमसंग अडकला. एका खेळाने तीन जणांना लटकविले आहे. आता संघात तीन विकेटकीपर कसे ठेवणार. केएल राहुल विकेटकीपिंग करतो, इशांत किशनही आहेच. आता तिसरा किपर संघात घेऊन दाखवा.., अशा शब्दांत शर्मा यांनी संघातील खेळाडूंची पोलखोल केली आहे.

त्यामुळेच कोणत्याही खेळाडूला जागा सोडायची नाही, त्याला माहीत आहे की कोणी आले, त्याने असे काही केले तर पुढची दोन वर्षे वाट पाहणे पक्के हे खेळाडूंना माहिती आहे. म्हणून ते इंजेक्शन घेत असतात, असे शर्मा म्हणाले. झीने चेतन शर्मा यांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. इशान किशनचे द्विशतक आणि शुभमन गिलच्या द्विशतकाच्या मधल्या कालावधीतील हे स्टिंग आहे.

"जसप्रीत बुमराहला वाकता आले नाही कारण त्याला मोठी दुखापत झाली होती. त्याखेरीज एक किंवा दोन खेळाडू आहेत जे गुप्तपणे इंजेक्शन घेतात आणि म्हणतात की ते खेळण्यासाठी योग्य आहेत", असे शर्मा म्हणाले.