Join us  

Pujara-Rahane : चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे पुढील कसोटी मालिकेत नाही खेळणार; मधल्या फळीत नव्यांना संधी मिळणार, जाणून घ्या टीम इंडिया आता कोणाबरोबर खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 6:24 PM

Open in App
1 / 8

Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane : फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकता आली नाही. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन अनुभवी फलंदाजांना त्यांची संघातील जागा टिकवून ठेवण्यासाठी ही अखेरची संधी होती. पण, त्यात ते अपयशी ठरले.

2 / 8

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात या दोघांनीच टीम इंडियाचा डाव सावरला हे खरे असले तरी त्या धावा संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशा ठरल्या नाहीत. तिसऱ्या कसोटीत जेव्हा खरी गरज होती, तेव्हाही हे दोघं अपयशी ठरले. आता या दोघांना पुढील कसोटी मालिकेतून संघातून वगळण्यात येणार असल्याचे वृत्त PTIनं दिले आहे. त्यामुळे या दोघांना आता कमबॅक करायचं असेल तर स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.

3 / 8

पुजारा व रहाणे यांना घरच्या मैदानापाठोपाठ परदेशातही चांगली कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत पुजारानं ६ डावांत १२४ धावा केल्या आहेत, तर रहाणेला ६ डावांत १३६ धावा करता आल्या आहेत. या मालिकेत पुजारानं तीन सामन्यांत ६, १६, ३, ५३, ४३, ९ अशा, तर रहाणेनं ४८, २०, ०, ५८, ९ व १ अशा धावा केल्या आहेत. रहाणेनं २०२० मध्ये अखेरचं शतक झळकावलं होते, तर पुजारानं २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियविरुद्धच १९३ धावांची खेळी केली होती.

4 / 8

पुजाराची मागील १२ महिन्यांतील कामगिरी पाहिल्यास त्यानं १५ सामन्यांत २५.२९च्या सरासरीनं ६८३ धावा केल्या आहेत आणि त्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. रहाणेनं १४ सामन्यांत २०.८४च्या सरासरीनं ५२१ धावा केल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त मयांक अग्रवाल यालाही काही खास करता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्यानं ६ डावांमध्ये २२.५०च्या सरासरीनं १३५ धावा केल्या आहेत.

5 / 8

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक फटका बसला आणि तो म्हणजे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC) गुणतालिकेत संघाची पाचव्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल तर भारताला वेळीच चुका सुधारून आगेकूच करावी लागेल.

6 / 8

भारताची पुढील कसोटी मालिका घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध आहे. या मालिकेत रहाणे व पुजारा यांना संधी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे वृत्त PTI ने दिले आहे. तेच याच मालिकेतून रोहित शर्माचेही कमबॅक होणार आहे.

7 / 8

रहाणे व पुजारा यांच्या अऩुपस्थितीत शुबमन गिल याला मधल्या फळीत खेळण्याची संधी दिली जाऊ शकते ( Shubman Gill likely to play in the middle order in the Test series against Sri Lanka), तर दुसऱ्या स्थानासाठी हनुमा विहारी किंवा श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकते.

8 / 8

पुढील 15 महिन्यांत भारतीय संघ श्रीलंका ( 2 कसोटी) , बांगलादेश ( 2 कसोटी) आणि ऑस्ट्रेलिया ( 4 कसोटी) यांच्याविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळणार आहे आणि हिच त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. श्रीलंकेचा भारत दौरा, २०२२ - २५ फेब्रुवारी ते १ मार्च - पहिली कसोटी, बंगलोर आणि ५ ते ९ मार्च - दुसरी कसोटी, मोहाली

टॅग्स :अजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजाराविराट कोहलीशुभमन गिलश्रेयस अय्यरभारत विरुद्ध श्रीलंका
Open in App