T20 World Cup Team India : ६ सामने, ४ अनुत्तरीत प्रश्न! ट्वेंटी-२० वर्ल्ड कपआधी भारताला शोधावी लागणार उत्तरं, अन्यथा...

T20 World Cup: भारतीय संघाच्या आशिया चषक २०२२ स्पर्धेतील कामगिरीनंतर चाहते निराश झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रयोगावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध भारतीय संघ प्रत्येकी ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि यातून ४ प्रश्नांची उत्तरं टीम इंडियाला शोधायची आहेत, अन्यथा...

T20 World Cup: भारतीय संघाच्या आशिया चषक २०२२ स्पर्धेतील कामगिरीनंतर चाहते निराश झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रयोगावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विराट कोहलीचे फॉर्मात येणे ही भारतीय संघासाठी आनंदाची गोष्ट आहे, परंतु रवींद्र जडेजा दुखापतीमुळे ट्वेंटी-२०ला मुकण्याची शक्यता दाट होत चालली आहे. आता भारताला त्याचा सक्षम पर्याय शोधायचा आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडे ६ सामने शिल्लक आहेत. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध भारतीय संघ प्रत्येकी ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि यातून ४ प्रश्नांची उत्तरं टीम इंडियाला शोधायची आहेत, अन्यथा...

आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारताला सुपर ४ मध्येच गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तान व श्रीलंका यांच्याकडून रोहित शर्मा अँड टीमला हार मानावी लागली आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले. आशिया चषकात भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, हेही तितकंच खरे आहे. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल या जलदगती गोलंदाजी उणीव प्रकर्षाने जाणवली. लोकेश राहुलला दणक्यात ओपनिंग करून देता आलेली नाही.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर आहे आणि त्याआधी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी संघाची मजबूत घडी बसवायची आहे. मजबूत घडी बसवल्यानंतर त्याची चाचपणी करण्यासाठी भारताला सहा सामने खेळण्याची संधी मिळेल. २० सप्टेंबरपासून ते ४ ऑक्टोबर या कालावधीत भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांनी तंदुरुस्ती टेस्ट पास केली आहे. या दोघांनाही दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेला मुकावे लागले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. त्याचवेळी नुकतेच दुखापतीतून सावरलेल्या या दोन प्रमुख गोलंदाजांवर ताण येणार नाही, याचीही काळजी द्रविडला घ्यावी लागणार आहे. तिसरा जलदगती गोलंदाज कोण असेल, याचाही निर्णय या मालिकांमधून घेतला जाईल. भुवनेश्वर कुमार आघाडीवर असला तरी दीपक चहर व मोहम्मद शमी हेही शर्यतीत आहेत.

आशिया चषक २०२२ मध्ये अंतिम ११ निवडताना रिषभ की कर्तिक हा प्रश्न सर्वांनाच पडला होता आणि संघाचा बँलेन्स राखण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. दोघांनाही एकाच वेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवणे अवघड आहे. रिषभ हा मधल्या फळीला आधार देऊ शकतो, तर कार्तिक हा उत्तम फिनिशर आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये या दोघांमध्ये संगीतखुर्चीचा खेळ रंगताना पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. आता ६ सामन्यांत जो मौके पे चौका मारेल, त्याचे चान्स अधिक वाढतील.

लोकेश राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली हे आघाडीचे तीन फलंदाज संघात फिक्स आहेत. पण, हे ढेपाळले तर डाव सावरणार कोण? सूर्यकुमार यादवचा फॉर्म चांगला सुरू आहे, परंतु हार्दिक पांड्या व रिषभ यांना सातत्य राखता येत नाहीए... मुळात या दोघांना त्यांच्या जबाबदारीबाबत स्पष्ट सांगण्यात आलेले नाही, असेच दिसतेय...

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता फार कमीच आहे. अशात त्याची जागा कोण भरून काढेल हा प्रश्न संघ व्यवस्थापनाला सतावतोय... अक्षर पटेलकडे अष्टपैलू कौशल्या आहे, परंतु आशिया चषक स्पर्धेत त्याच्यावर विश्वास दाखवला गेला नाही. डावखुरा फलंदाज संघाकडे नसल्याने त्याचा विचार करण्यास हरकत नाही. दीपक हुडा हा एक पर्याय आहे.