विराट-अनुष्कासह टीम इंडियाच्या सदस्यांना 150 दिवस राहावं लागेल कुटुंबीयांपासून लांब, जाणून घ्या कारण...

चार महिन्यांनंतर भारतीय क्रिकेटपटूंसाठी आनंदाची वार्ता आली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्यात आल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला.

19 सप्टेंबर ते 8/10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचा 13वा मोसम संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच खेळाडूंमध्ये उत्साह संचारला आहे. पण, क्रिकेट सुरू होत असल्याचा आनंद असला तरी खेळाडूंना त्यासाठी 5 महिने कुटुंबीयांपासून दूर रहावे लागणार आहे.

बीसीसीआयच्या योजनेनंतर भारतीय संघाचा राष्ट्रीय सराव शिबीर आयोजित केले जाणार आहे आणि त्यानंतर खेळाडू आयपीएलसाठी यूएईला रवाना होतील. पण, सराव शिबीराबाबत अजूनही बीसीसीआयनं कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.

यूएईत होणाऱ्या आयपीएलसाठी आठ संघ 20 ऑगस्टला रवाना होणार असल्याची शक्यता, गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी वर्तवली होती. पण, अजून बीसीसीआयला केंद्र सरकारची परवानगी मिळायची आहे.

सुरुवातीला आयपीएल 51 दिवस होणार अशी चर्चा होती, परंतु आता तो कालावधी 53 दिवसांचा झाला आहे. त्या बाबतची अधिकृत घोषणा येत्या शनिवारी होण्याची शक्यता आहे.

आयपीएलची फायनल 8 नोव्हेंबरऐवजी 10 तारखेला घेण्याची चर्चा आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. कारण, यूएईतून भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंना आयपीएल संपेपर्यंत यूएईतच रहावे लागणार आहे.

कोरोना व्हायरसचं संकट पाहता आयपीएल ही प्रेक्षकांशिवाय होणार आहे. त्याशिवाय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन जाता येणार नाही.

त्यामुळे जर यूएईतून खेळाडू थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असतील, तर त्यांना कुटुंबीयांपासून जवळपास 150 दिवस दूर रहावे लागेल. ऑस्ट्रेलियातही कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी बीसीसीआय देईल याची शक्यता कमी आहे.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा दोन महिन्यांहून अधिक काळ असणार आहे. 3 डिसेंबरपासून या दौऱ्याला कसोटी मालिकेनं सुरुवात होईल. चार कसोटी, तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांची ही मालिका असणार आहे.

Read in English