Danushka Gunathilaka Arrested: शाहिद आफ्रिदी, शेन वॉर्नपासून ते दानुष्का गुनाथिलकापर्यंत; हे क्रिकेटपटू अडकलेत सेक्स स्कॅंडलच्या जाळ्यात

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आशियाई किंग्ज श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला असून मायदेशी रवाना झाला आहे. अशातच श्रीलंकेच्या दनुष्का गुनाथिलका बलात्काराच्या आरोपाखाली सिडनी पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीलंकेचा संघ सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. श्रीलंकेचा संघ मायदेशात परतत असतानाच संघाचा फलंदाज दानुष्का गुनाथिलकाला सिडनीत अटक करण्यात आली आहे. टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या गुणथिलकाला संघाच्या हॉटेलमधून अटक करण्यात आली. गुनाथिलका याच्यावर या आठवड्याच्या सुरुवातीला २९ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दानुष्का गुणथिलकाच्या आधी अनेक स्टार क्रिकेटपटू अशा आरोपांमुळे वादात सापडले होते. काहींनी तर गुन्हा केल्याची कबुली देखील दिली होती. यापैकीच एक नाव म्हणजे शेन वॉर्न. साल २००० मध्ये वॉर्न एका ब्रिटिश नर्सला अश्लील कॉल आणि मेसेज पाठवताना पकडला गेला होता. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियन संघाचे उपकर्णधारपद गमवावे लागले. २००३ मध्ये वॉर्नचे नाव एका सेक्स स्कँडलमध्ये आले होते. त्यानंतर २००६ मध्ये वॉर्न एका व्हिडीओमध्ये दोन ब्रिटीश मॉडेल्ससोबत देखील दिसला होता. खरं तर वॉर्नचे नाव कमीत कमी ९ सेक्स सॅंकडलमध्ये आले होते. याशिवाय त्याने त्याच्या आत्मचरित्रातही काहींचा उल्लेख केला आहे.

या यादीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचाही समावेश आहे. २००० मध्ये आफ्रिदी आणि इतर काही क्रिकेटर्स हॉटेलच्या रूममध्ये काही मुलींसोबत पकडले गेले होते. तेव्हा त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, मुली ऑटोग्राफ घेण्यासाठी आल्या होत्या पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) देखील त्यांच्यावर विश्वास बसला नाही. या सर्वांना केनिया येथे होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळण्यात आले होते.

इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक असलेला केव्हिन पीटरसन अनेकदा वादात सापडला होता. बिग ब्रदर फेम प्लेबॉय मॉडेल वेनेसा निम्मोसोबतचे त्याचे अफेअर चर्चेत आले होते. खरं तर पीटरसनने एका मेसेजद्वारे निम्मोसोबत ब्रेकअप केले होते. यानंतर निम्मोने पीटरसनवर गंभीर आरोप केले. "केव्हिन सेक्ससाठी आग्रही होता आणि दिवसभर माझ्या मागे फिरत राहायचा." असा गंभीर आरोप निम्मोने केला होता.

टी-२० क्रिकेटचा बादशाह असलेल्या ख्रिस गेलला श्रीलंकेतील एका हॉटेलमध्ये तीन ब्रिटिश महिलांसोबत पकडले गेले होते. दुसरी घटना बिग बॅश लीग दरम्यान घडली जेव्हा गेलने एका टीव्ही प्रेजेंटरला ड्रिंक्ससाठी विचारले आणि 'बेबी' म्हटले होते. याशिवाय २०१५च्या विश्वचषकादरम्यान एका महिला कर्मचाऱ्याने गेलवर प्रायव्हेट पार्ट दाखवल्याचा आरोप केला होता.

हर्शल गिब्सने आपले आत्मचरित्र 'टू द पॉइंट'मध्ये खळबळजनक खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियात १९९९ च्या विश्वचषकादरम्यान गिब्सचे एका हॉटेल कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध होते. आणखी एका घटनेचा संदर्भ देत गिब्स लिहितात की, "दोन बेड, दोन क्रिकेटर आणि तीन महिला. त्यातील एक एवढी इच्छुक नव्हती, ती फक्त बेडवर बसलेली होती. तेही ठीक होते. ते प्रत्येकासाठी पुरेसे होते. इतर दोन मुलींनी अप्रतिम कामगिरी केली."

काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर इमाम-उल-हकच्या कथित आक्षेपार्ह चॅट व्हायरल झाल्या होत्या. स्क्रीनशॉट शेअर करताना इमाम एकाच वेळी ७-८ महिलांना डेट करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. इमामने अधिकृतपणे यावर प्रतिक्रिया दिली नाही, परंतु पीसीबीने हस्तक्षेप केल्यावर इमामने याप्रकरणी माफी मागितली होती.

आयसीसी अम्पायरच्या एलिट पॅनेलच्या यादीत असलेल्या असद रौफवर २०१२ मध्ये खूप गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर २१ वर्षीय भारतीय मॉडेलने असदसोबत अफेअर असल्याचा दावा केला होता. असदवर लग्नाच्या नावाखाली लैंगिक शोषणाचा आरोपही होता. याबाबत काही फोटोही समोर आले होते. मी तिच्याकडे फक्त 'फॅनगर्ल' म्हणून पाहत होतो आणि लग्नाचे कोणतेही वचन दिले नव्हते, असे रौफने स्पष्ट केले होते.

२००५ मध्ये न्यूझीलंडच्या संघाचा वेगवान गोलंदाज डॅरेल टफीचा एक कथित MMS समोर आला होता. दोन ब्रिटीश बॅकपॅकर्सनी २३ वर्षीय सेल्स प्रतिनिधीसोबत संमतीने सेक्स करताना टफीचे मोबाईल फोनवर चित्रीकरण केले होते. जेव्हा हे प्रकरण चर्चेत आले तेव्हा दोन्ही बॅकपॅकर्स गायब झाल्या आणि तेथे असलेल्या महिलेने टफीला भेटण्यासही नकार दिला.