भारत, न्यूझीलंड यांची गाडी सुसाट; 'डच'च्या धक्क्यामुळे उर्वरित दोन जागांसाठी शर्यत जबराट

ICC ODI World Cup 2023 Semi Final Scenario : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा तिसरा टप्पा काल पूर्ण झाला... अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स ( डच ) यांनी धक्कादायक निकालाची नोंद करताना अनुक्रमे गतविजेता इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांना पराभूत केले.

आफ्रिकेने ज्या पद्धतीने वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवात केली होती, ते पाहता डच विरुद्ध ते सहज जिंकतील असा अंदाज होता. पण, घडलं विचित्र अन् त्यामुळे उपांत्य फेरीचं गणितही मजेशीर झालं आहे. स्पर्धेत सहभागी सर्व संघांचे प्रत्येकी ३ सामने झाले आहेत आणि भारत व न्यूझीलंड हे दोनच संघ अपराजित आहेत.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येक संघाला ९ सामने जिंकायचे आहेत आणि उपांत्य फेरीतील जागा निश्चित करण्यासाठी ७ विजय हे साधं सोपं समिकरण आहे. भारत आणि न्यूझीलंड यांनी प्रत्येकी ३ गुणांसह अव्वल दोन स्थानांवरील पकड मजबूत केली आहे.

भारतीय संघ १.८२१ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे, तर न्यूझीलंड १.६०४ नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेला काल पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांचा नेट रन रेट १.३८५ असा आहे आणि ते ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पाठोपाठ पाकिस्तान ( -०.१३७ ) चौथ्या क्रमांकावर आहेत.

गुणतालिकेत अव्वल चारमध्ये असलेल्या संघांमध्ये भारत व न्यूझीलंड सध्या सेफ आहेत. त्यांना आता उर्वरित ६ सामन्यांपैकी ४ विजय उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी पुरेसे आहेत. भारतीय संघाला उर्वरित सामन्यांत न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्स यांचा सामना करायचा आहे.

न्यूझीलंड आज अफगाणिस्तानविरुद्ध खेळतोय आणि उर्वरित लढतीत त्यांना भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान व श्रीलंका यांच्याविरुद्ध खेळायचे आहे. पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेचा मार्ग आता थोडा अवघड झालाय आणि त्यांना ६ पैकी ५ सामने जिंकावे लागतील. एकूण ६ सामने जिंकूनही त्यांना संधी आहे, परंतु मग नेट रन रेटचा खेळ महत्त्वाचा ठरेल.

इंग्लंड, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स यांनी ३ पैकी प्रत्येकी १ विजय मिळवला आहे. त्यांना उर्वरित ६ पैकी सहा किंवा किमान ५ सामने जिंकावे लागतील. नेट रन रेटही महत्त्वाचा आहेच. श्रीलंकेचे आव्हान जवळपास संपुष्टात आहे आणि त्यांना ६ पैकी ६ सामने जिंकून नेट रन रेटवर काम करावं लागेल.

श्रीलंका, नेदरलँड्स यांचे उपांत्य फेरी गाठणे अवघड असले तरी ते आता शर्यतीत असलेल्या संघांना धक्का देऊन इतरांसाठी संधी निर्माण करू शकतात.