अश्विनसोबत चुकीचं केलं, अनेकदा संधीही दिली नाही; माजी पाकिस्तानी खेळाडूचा विराटवर आरोप

Virat Kohli - Ravichandran Ashwin : पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनसोबत कोहलीनं चुकीची वागणूक केल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनसोबत कोहलीनं चुकीची वागणूक केल्याचा आरोप केला आहे. गेल्या तीन चार वर्षांमध्ये त्याला चुकीची वागणूक मिळाली असून विराट कोहलीनं महत्त्वाच्या प्रसंगी त्याला संधी दिली नसल्याचंही पाकिस्तानच्या फिरकीपटूनं सांगितलं.

विराट कोहलीसोबत फिरकीरटूनं पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझम याच्या कसोटी सामन्यातील खेळाच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियानं कोहलीवर आरोप केला आणि बाबर आझमवरही निशाणा साधला.

दानिश कनेरियाने जनसत्ता डॉट कॉमशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान रविचंद्रन अश्विनबद्दल तो मोकळेपणाने बोलला. दानिश कनेरियानं नुकताच भारताचा संभावित टी २० संघ कसा असावा याबाबत सांगितलं होतं. यामध्ये अश्विनला त्यानं उपकर्णधार म्हटलं होतं. तसंच याचं कारणही सांगितलं होतं. शिवाय बाबर आझम आणि विराट कोहलीच्या तुलनेवरही चर्चा केली होती.

अश्विनला उपकर्णधार म्हणण्याच्या प्रश्नावर दानिश कनेरिया म्हणाला, 'मी अश्विनला दोन कारणांसाठी उपकर्णधार असं म्हटलं. मी अश्विनला जादूगार म्हणतो. त्याला क्रिकेटचे भरपूर ज्ञान आहे. तो एक सक्षम क्रिकेटपटू आहे आणि त्यामुळेच त्याला उपकर्णधार म्हटलं आहे. तो तरुण कर्णधाराला साथ देऊ शकतो."

विराट कोहलीनं अश्विनसोबत वाईट वर्तणूक केली. त्याला अनेक महत्त्वाच्या प्रसंगी संधी देण्यात आली नाही. अश्विनला कसोटी चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्यातही स्थान देण्यात आलं नसल्याचं त्यानं नमूद केलं.

टी २० विश्वचषक स्पर्धेत तो पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरोधात खेळला नव्हता. भारतीय संघाला या सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. परंतु आता तो परतला आहे आणि त्यानं जोरदार पुनरागनही केल्याचं कनेरिया म्हणाला.

दानिश कनेरियाने विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यात होणाऱ्या तुलनेबद्दलही वक्तव्य केलं. तो म्हणाला, 'बाबर आझम आणि विराट कोहली यांची तुलना करणं हे घाईचं ठरेल. बाबर आझम आपल्या अजून वाईट काळातून कसा बाहेर पडतो हे वेळ आल्यावर पाहावं लागेल. त्याची सुरूवात आहे आणि विराट केहलीनं प्रत्येक ठिकाणी स्वत:ला सिद्ध केलं आहे.

टी २० नाही, तर कसोटी सामन्यांमध्ये बाबर आझम स्वत:ला सिद्ध करत नाही तोवर त्याची विराटशी तुलना करणं योग्य ठरणार नाही. ज्या दिवशी तो स्वत:ला सिद्ध करेल, परफॉर्मन्सच्या जोरावर विजय मिळवून देईल, १०० कसोटी सामने खेळेल त्या दिवशी त्याची विराटशी तुलना करता येईल, असंही कनेरिया म्हणाला.

दानिश कनेरियानं पाकिस्तानसाठी अनेक कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावे २६१ विकेट्सही आहेत. तसंच पाकिस्तानसाठी सर्वाधित कसोटी विकेट्स घेणारा तो गोलंदाज आहे. २००९ मध्ये एका काऊंटी स्पॉट फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं त्याच्यावर लाईफटाईम बॅन लावला होता.