पती 'मॅचविनर' तर पत्नी हॉकी चॅम्पियन! टीम डेव्हिडच्या पत्नीला पाहिलंत का?

tim david ipl 2023 : राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना टीम डेव्हिडने खऱ्या अर्थाने अविस्मरनीय केला.

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना टीम डेव्हिडने खऱ्या अर्थाने अविस्मरनीय केला. डेव्हिडच्या स्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईने आयपीएलच्या इतिहासातील १०००व्या सामन्यात विजय मिळवला. २०० पार धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने सांघिक खेळी करून विजय साकारला.

मुंबईला अखेरच्या षटकांत विजयासाठी १७ धावांची गरज असताना डेव्हिडने षटकारांची हॅटट्रिक मारली. जेसन होल्डरने टाकलेल्या तिन्ही चेंडूना सीमारेषेबाहेर पाठवण्यात डेव्हिडला यश आले आणि मुंबईने ६ गडी अन् ३ चेंडू राखून विजय मिळवला.

काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ बाद २१२ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने ६२ चेंडूत १२४ धावांची शानदार शतकी खेळी केली.

२१३ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला सुरूवातीला मोठे धक्के बसले. कर्णधार रोहित शर्मा (३) धावा करून वादग्रस्त निर्णयाचा शिकार ठरला. तर इशान किशनला (२८) रविचंद्रन अश्विनने बाहेरचा रस्ता दाखवला. मग कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला आणि विजयाकडे कूच केली.

ग्रीनने ४४ तर सूर्याने २९ चेंडूत ५५ धावांची अप्रतिम खेळी केली. अखेरच्या काही षटकांमध्ये तिलक वर्माने सावध खेळी करत टीम डेव्हिडला साथ दिली. डेव्हिडने १४ चेंडूत ४५ धावा करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

अखेरच्या षटकात सामन्याचा निकाल बदलणाऱ्या टीम डेव्हिडची पत्नी देखील एक ॲथलीट आहे. तिने आपल्या खेळाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्टेफनी केरशॉ असे डेव्हिडच्या पत्नीचे नाव आहे.

स्टेफनी केरशॉ ही ऑस्ट्रेलियाच्या हॉकी संघाचा भाग आहे. तिने ऑस्ट्रेलियासाठी टोकियो ऑलिम्पिक देखील खेळले आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियन संघात पदार्पण करणारी स्टेफनी केरशॉ एक फॉरवर्ड खेळाडू आहे.

२०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत देखील ती ऑस्ट्रेलियन संघात होती. तेव्हा कांगारूचा संघ उपविजेता ठरला होता. त्यामुळे स्टेफनी केरशॉच्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. २०२० ऑलिम्पिकचा हिस्सा राहिलेल्या स्टेफनीने यंदा भारतात पार पडलेल्या विश्वचषकात देखील भाग घेतला होता.

टीम डेव्हिड २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला होता. त्याला कायरन पोलार्डच्या जागी मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

काल अखेरच्या षटकांत मुंबई इंडियन्सला विजयासाठी १७ धावांचे आव्हान होते. टीम डेव्हिडकडे मुंबईच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या. तर संजू सॅमसनने जेसन होल्डरवर विश्वास दाखवत अखेरचे षटक त्याला दिले. होल्डरने टाकलेला पहिलाच चेंडू सीमारेषेबाहेर लावण्यात डेव्हिडला यश आले.

खरं तर होल्डरने तिन्ही चेंडू फुल टॉस टाकले, ज्याचा डेव्हिडने पुरेपुर फायदा उचलला. ३ चेंडूत ३ षटकार ठोकून डेव्हिडने राजस्थानला पराभवाची धूळ चारली आणि मुंबईच्या संघाने आपल्या कर्णधाराला वाढदिवसादिवशी विजयी भेट दिली.