IPL 2021: खेळाडूंच्या अंगावर काटा उभा राहतो, इतकं जबरदस्त प्रोत्साहन देतो 'हा' दिग्गज प्रशिक्षक; गोलंदाजानं केला खुलासा!

IPL 2021: आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून एका विजयानंतर संघाचं प्ले-ऑफमधील स्थान निश्चित होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनं गेल्या दोन वर्षांमध्ये स्पर्धेत अफलातून कामगिरीची नोंद करत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे.

ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदा आयपीएलच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंग याच्याकडे आहेत.

रिकी पाँटिंगची फलंदाजीतील आक्रमकता आणि नेतृत्त्व गुण आपण आजवर मैदानात पाहिलेच होते. पण तो एक प्रशिक्षक म्हणूनही सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं आहे.

रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाबाबत दिल्ली कॅपिटल्सचा युवा गोलंदाज आवेश खान यानं महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. रिकी पाँटिंग भारतीय युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या खेळाडूंची मोट बांधून त्यांना आक्रमकपणे खेळण्यासाठी नेट्समध्ये मोलाची भूमिका पार पाडत आहे.

ड्रेसिंग रुममध्ये जेव्हा रिकी पाँटिंग संघाला मार्गदर्शन करत असतात तेव्हा त्यांच्या प्रोत्साहनपर भाषणानं प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो आणि एक वेगळाच जोश निर्माण होतो, असं आवेश खान यानं म्हटलं आहे.

"रिकी सरांसोबत हे माझं चौथं वर्ष आहे. त्यांच्याबद्दल मी एकच सांगू शकतो की ते जितके महान क्रिकेटपटू राहिले, तितकेच ते एक महान प्रशिक्षक देखील आहेत. ते मानसिक गोष्टींवर जास्त भर देतात. क्रिकेट हा एक मानसिक प्राबल्याचा खेळ आहे असं ते मानतात आणि ड्रेसिंग रुममध्ये नेहमीत जोशपूर्ण वातावरण ते ठेवतात. त्यांच्या भाषणानं खेळाडूंच्या अंगावर काटा उभा राहतो", असं आवेश खान म्हणाला.

रिकी पाँटिंग महान फलंदाज असूनही ते त्यांच्यात कधीच मोठेपणा दिसत नाही. त्यांच्याशी आम्ही कोणत्याही विषयावर सहजपणे बोलू शकतो असं त्यांनी संघात वातावरण ठेवलं आहे, असंही आवेश खान म्हणाला.

"रिकी पाँटिंग मला आधी तू संघाचा छुपा नायक आहेस असं म्हणायचे पण गेल्या सामन्यात मी तीन विकेट्स घेतल्यानंतर ते म्हणाले अभिनंदन तू आता छुपा नायक नाही राहिलास आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे", असं आवेश खान यानं सांगितलं.

दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या आवेश खान यानं यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण ११ सामन्यांमध्ये १८ विकेट्स मिळवल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो टॉप-५ मध्ये आहे. दिल्लीचा संघ ११ सामन्यांमध्ये १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून फक्त एका विजयानंतर संघ प्ले-ऑफमधील संघाचं स्थान निश्चित होणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सची लढत आता मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. मुंबई इंडियन्सकडून यंदा अत्यंत निराशाजनक कामगिरी पाहायला मिळत आहे. मुंबईनं गेला सामना जिंकला असला तरी त्याआधीचे तीन सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याची दावेदारी सिद्ध करण्यासाठी मुंबईला आता उर्वरित सामन्यांमध्ये विजय प्राप्त करावा लागणार आहे.