BCCI vs PCB: "मी लिहून देतो पाकिस्तान विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येईल, भारत नेहमी मोठ्या भावाची भूमिका पार पाडतो"

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. अशातच भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे.

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) लांबलचक पत्र काढून टीका केली.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लांबलचक पत्रक काढून बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांच्यावर टीका केली आहे. तसेच पाकिस्तानने 2023 मध्ये भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडण्याची धमकी दिली. आता यावरून दोन्ही देशातील माजी खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.

खरं तर आशिया चषक 2023 चा थरार पाकिस्तानच्या धरतीवर रंगणार आहे. अशातच भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील राजकीय परिस्थिती पाहता भारत पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. यावरून आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बीसीसीआय पीसीबीला विश्वासात न घेता असा कसा निर्णय घेऊ शकते असा प्रश्न पाकिस्तान बोर्डाने विचारला आहे.

अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आशियाई संघटनेकडून एक रूपया देखील घेत नाही. उलट भारत इतर बोर्डांना पैसे देतो. भारत मोठ्या भावाची भूमिका पार पाडतो. त्यामुळे मी लिहून देतो की भारत आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. असा दावा आकाश चोप्राने केला आहे.

"खरं तर पाकिस्तानने जरी म्हटले असले की आम्ही 2023च्या विश्वचषकावर बहिष्कार टाकू तरीदेखील मी लिहून देतो की पाकिस्तान विश्वचषक खेळण्यासाठी भारतात नक्कीच येईल. भारत नसेल तर आशिया चषकाची स्पर्धा होणार नाही ती बंद करावी लागेल. आयसीसीच्या तुलनेत आशिया चषक लहान आहे. पाकिस्तान भारतात होणाऱ्या विश्वचषकात आला नाही तर त्यांचे मोठे नुकसान होईल. कारण आयसीसीकडून त्यांना मिळणारे पैसे दिले जाणार नाहीत." असे परखड मत आकाश चोप्राने मांडले.

तसेच मी पाकिस्तानला गांभीर्याने घेत नाही. आशिया चषक बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार ठरल्याप्रमाणे तटस्थ ठिकाणीच होईल. असेही आकाश चोप्राने म्हटले. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय क्रिकेट बोर्डाची मक्तेदारी सुरू असल्याचे पीसीबीने पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे, PCB ने आता आशियाई क्रिकेट परिषदेला विनंती केली आहे की या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या शक्य तितक्या लवकर आपल्या बोर्डाची तातडीची बैठक बोलवावी.

भारतीय संघ पाकिस्तानात कोणतीच स्पर्धा खेळण्यासाठी जाणार नाही अशी भूमिका बीसीसीआयची आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकाची स्पर्धा तटस्थ ठिकाणी व्हावी अशी मागणी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली आहे. खरं तर यापूर्वी 2008 साली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर या शेजारील राष्ट्रांमध्ये ना दौरे झाले ना कोणतील मालिका झाली. मुंबईवरील दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने शेजाऱ्यांशी संबंध तोडले. केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात.

पीसीबीने भारतात होणाऱ्या विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्यानंतर पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारताशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोलमडू शकते असे राजा या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. "भारतीय क्रिकेट बोर्ड आयसीसीला 90 टक्के फंडिंग देत असते. त्यामुळे उद्या जर भारताच्या पंतप्रधानांनी म्हटले की हे फंडिंग द्यायचे नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यामुळे कोलमडू शकते", असे रमीझ राजा म्हणत आहेत.