जगात नंबर १ मग एक महिन्यांत पाकिस्तानी संघ कसा बर्बाद झाला? भारतासोबत ती मॅच अन् गर्व...

वन डे विश्वचषकात पाकिस्तानी संघाने केलेली लाजिरवाणी कामगिरी पाहून त्यांच्याच देशातील माजी खेळाडूंनी डोक्याला हात लावला.

वन डे विश्वचषकात पाकिस्तानी संघाने केलेली लाजिरवाणी कामगिरी पाहून त्यांच्याच देशातील माजी खेळाडूंनी डोक्याला हात लावला. शेजाऱ्यांच्या पराभवाची हॅटट्रिक झाली अन् बाबर आझमच्या संघाचे उपांत्य फेरीचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे. या स्पर्धेपूर्वी ट्रॉफी जिंकणार अशा बाता मारणारे सर्वच पाकिस्तानी आजच्या घडीला गार पडले आहेत.

पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर माजी खेळाडू जोरदार टीका करत आहेत. बाबर आझम, हारिस रौफ, इमाम-उल-हक आणि प्रशिक्षक मिकी आर्थर यांची खिल्ली उडवण्यामध्ये पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांमध्ये जणू काय स्पर्धाच सुरू आहे. घातक गोलंदाजी म्हणून पाक गोलंदाजांना माध्यमांसह जाणकारांनी हरभऱ्याच्या झाडावर चढवलं असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

शेजाऱ्यांनी विश्वचषकात आतापर्यंत पाच सामने खेळले असून तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. अफगाणिस्तानने ऐतिहासिक विजय मिळवून पाकिस्तानी संघासह त्यांच्या क्रिकेट बोर्डाला कामाला लावले. कारण पाकिस्तानला अफगाणिस्तानविरूद्धचा पराभव फार जिव्हारी लागला आहे.

आशिया चषक २०२३ च्या तोंडावर पाकिस्तानी संघ जगातील नंबर १ संघ होता. पण अचानक चक्र फिरले अन् शेजाऱ्यांची फजिती झाली. बाबर आझम अद्याप आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी असला तरी त्याला कर्णधारपद सांभाळण्यात अपयश आल्याचे दिसते. त्याने सावध खेळी करून योगदान दिले असले तरी बाबरचा स्ट्राईक रेट कळीचा मुद्दा आहे.

जगातील घातक गोलंदाजी अटॅक म्हणून मिरवणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांची हल्ली चांगलीच धुलाई होत आहे. शाहीन आफ्रिदी स्विंग आणि हारिस रौफ त्याच्या गतीने फलंदाजांना घाम फोडेल असा आत्मविश्वास पाकिस्तानला होता. मात्र, विश्वचषकात त्यांची चांगलीच धांदल उडाली. नसीम शाहच्या अनुपस्थितीत पाकिस्तानची गोलंदाजी क्लब क्रिकेटला लाजवेल अशी झाली.

२०२१ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात भारताला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा आत्मविश्वास शिगेला पोहचला. दुसरीकडे, भारतीय स्टार लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरत होते. त्यामुळे इतिहास बदलण्याच्या इराद्याने शेजाऱ्यांचा संघ वन डे विश्वचषकात उतरले होते.

कट्टर प्रतिस्पर्धी २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या धरतीवर आशिया चषकात आमनेसामने आले. पावसाच्या कारणास्तव सामना पूर्ण होऊ शकला नाही पण शाहीन आफ्रिदीने पाच बळी घेऊन भारताची डोकेदुखी वाढवली होती. याशिवाय हारिस रौफ (३) आणि नसीम शाहला (३) बळी घेण्यात यश आले. इशान किशन आणि हार्दिक पांड्या वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नव्हती.

पुढच्या सामन्यात नवख्या नेपाळचा पराभव करून भारताने सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवला. तिथे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान असा सामना झाला. मात्र, यावेळी भारतीय फलंदाजांनी बाजी मारली अन् शेजाऱ्यांची पळता भुई थोडी केली. रोहित शर्मा (५६), शुबमन गिल (५८), विराट कोहली नाबाद (१२२) आणि लोकेश राहुलने नाबाद (१११) धावा करून शेजाऱ्यांसमोर धावांचा डोंगर उभारला. ३५७ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ १२८ धावांवर पाकिस्तानी संघ आटोपला.

भारताविरूद्ध २२८ धावांनी पराभव अन् तिथूनच पाकिस्तानी संघाची बर्बादी होण्यास सुरूवात झाली. तरीदेखील विश्वचषक उंचावण्याच्या इराद्याने बाबरसेनेने तब्बल सात वर्षांनंतर भारतीय भूमीवर पाऊल ठेवले. पण, शेजाऱ्यांना दोन्ही सराव सामन्यातच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली. इथूनच पाक गोलंदाजांची अग्निपरीक्षा सुरू झाली.

दरम्यान, विश्वचषकाच्या अभियानाला सुरूवात होताच पाकिस्तानने नेदरलॅंड्सचा पराभव करून विजयी सलामी दिली. याशिवाय श्रीलंकेने दिलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करून दुसरा विजय मिळवला अन् पुन्हा आपल्या चाहत्यांना जल्लोषाची संधी देण्यात पाकिस्तानी अपयशी ठरले.

बाबर आझमचा संघ जेव्हा अहमदाबाद येथे भारताशी भिडायला आला तेव्हा रोहितसेनेने शेजाऱ्यांना त्यांची जागा दाखवली. सव्वा लाख प्रेक्षकांच्या समोर पाकिस्तानचा संघ केवळ १९१ धावांत आटोपला. भारताने सात गडी राखून मोठा विजय मिळवला अन् पाकिस्तानची गाडीवर रूळावरून घसरली. तेव्हापासून शेजारी विजयाच्या शोधात असून ऑस्ट्रेलियापाठोपाठ अफगाणिस्तानने देखील त्यांना पराभवाची धूळ चारली.