IPL 2023: ड्वेन ब्राव्होचं कायरन पोलार्डच्या पाऊलावर पाऊल; निवृत्तीनंतर सीएसकेने सोपवली मोठी जबाबदारी

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने एक भावनिक पोस्ट करून याबाबत माहिती दिली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेच्या फ्रँचायझीने त्याला आयपीएल 2023 पूर्वी होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी रिलीज केले होते.

सीएसकेने रिलीज केल्यानंतर या अष्टपैलू खेळाडूने लिलावासाठी आपले नाव दिले नव्हते. अखेर आज ब्राव्होने निवृत्तीची घोषणा केली. त्यांनतर सीएसकेच्या संघाने ड्वेन ब्राव्होची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ब्राव्होने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता नव्या भूमिकेत दिसणार आहे.

ड्वेन ब्राव्होने एक भावनिक पोस्ट करून आयपीएलमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. "15 वर्ष सर्वात मोठ्या ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळल्यानंतर मी आज जाहीर करतो की मी यापुढे IPL मध्ये भाग घेणार नाही. अनेक चढ-उतारांसह हा एक उत्तम प्रवास आहे. त्याचवेळी मी मागील 15 वर्षांपासून आयपीएलचा भाग असल्याबद्दल कृतज्ञ आहे."

"मला माहित आहे की हा दिवस माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या चाहत्यांसाठी दुःखाचा दिवस आहे. पण त्याच वेळी गेल्या 15 वर्षांतील माझी कारकीर्द आपण सर्वांनी साजरी करावी अशी माझी इच्छा आहे. मी माझ्या चाहत्यांना हे सांगू इच्छितो की मी माझी कोचिंग कॅप घालण्यास उत्सुक आहे."

"मी CSK मधील युवा गोलंदाजांसोबत काम करण्यास उत्सुक आहे. मी या नवीन संधीबद्दल खरोखर उत्साहित आहे. चॅम्पियन्सच्या पुढच्या पिढीला मदत करणे आणि विकसित करणे हे आता माझे काम आहे. वर्षानुवर्षे दिलेल्या सर्व प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद."

ड्वेन ब्राव्होने त्याचा जवळचा सहकारी कायरन पोलार्डच्या पाऊलावर पाऊल टाकत चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. खंर तर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने अलीकडेच आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या संघाचा प्रशिक्षक असणार असल्याचे मुंबईच्या फ्रँचायझीने स्पष्ट केले.

ड्वेन ब्राव्होने इंडियन प्रीमियर लीगच्या 161 सामन्यांमध्ये 183 बळी घेतले आहेत आणि 130 च्या स्ट्राईक रेटने 1,560 धावा केल्या आहेत. तो चेन्नई सुपर किंग्जच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक होता. CSK च्या 2011, 2018 आणि 2021 मध्ये IPL विजेतेपद आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 जिंकण्याचा एक भाग होता.

दोन आयपीएल हंगामात (2013 आणि 2015) सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून पर्पल कॅप जिंकणारा ड्वेन ब्राव्हो हा पहिला खेळाडू होता. ड्वेन ब्राव्होने चेन्नई सुपर किंग्जसाठी 144 सामने खेळले असून 168 बळी घेतले आणि 1556 धावा देखील केल्या आहेत.

ड्वेन ब्राव्होच्या आधी त्याचा सहकारी क्रिकेटपटू कायरने पोलार्डने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे पोलार्ड IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी प्रशिक्षकाची धुरा सांभाळणार आहे. पोलार्ड पाठोपाठ आणखी एक वेस्ट इंडिजचा खेळाडू आयपीएलच्या प्रमुख संघाचा प्रशिक्षक झाला आहे.