Join us  

नवदीप सैनीला एका सामन्यासाठी मिळायचे २०० रुपये; त्याच्यासाठी गौतम गंभीरनं संघ व्यवस्थापनाशी केलेलं भांडण!

By स्वदेश घाणेकर | Published: January 07, 2021 3:00 PM

Open in App
1 / 8

नवदीप सैनीनं ( Navdeep Saini) ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. जसप्रीत बुमराहकडून त्याला कसोटी कॅप देण्यात आली. उमेश यादवनं दुखापतीमुळे माघार घेतल्यानं नवदीपला कसोटी संघात स्थान देण्यात आले. भारताकडून कसोटी खेळणारा तो २९९ वा खेळाडू ठरला.

2 / 8

हरयाणा येथील करनाल येथे जन्मलेल्या नवदीप सैनीनं मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानं आतापर्यंत ७ वन डे व १० ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. त्यानं वन डेत ६ व ट्वेंटी-२० १३ विकेट्स घेतल्या आहेत.

3 / 8

२७ वर्षीय नवदीप सैनी सुरुवातीला टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. टेनिस बॉल ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट हा प्रवास संघर्षमयी आहे. त्याला रणजी क्रिकेट खेळण्याची संधी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्यामुळे मिळाली. नवदीपला संघात घेण्यासाठी गंभीरनं अधिकाऱ्यांशी भांडण केलं होतं.

4 / 8

दिल्लीचा क्रिकेटपटू सुनित नरवाल यानं सैनीला टेनिस बॉल क्रिकेट खेळताना पाहिले आणि त्याला दिल्लीला येण्यास सांगितले. दिल्ली संघाची निवड समिती बाहेरील खेळाडूला संघात घेण्यास इच्छूक नव्हते. २०१६मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेतून तो दिल्ली संघाबाहेर होणार होता, परंतु गंभीर त्याच्या पाठीशी खंबीर राहिला.

5 / 8

त्यानंतर २०१७-१८च्या सत्रात त्यानं ३४ विकेट्स घेताना दिल्लीला रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला, परंतु विदर्भ संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. २०१७मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघानं त्याला खरेदी केलं. त्यानंतर पुढील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं त्याच्यासाठी ३ कोटी मोजले.

6 / 8

२०१३साली टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या नवदीपला करनाल येथे स्थानिक स्पर्धेत खेळण्यासाठी २०० रुपये प्रती सामना मिळायचे.

7 / 8

नवदीपनं ४६ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२८ विकेट घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५४ सामन्यांत ८१ विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

8 / 8

नवदीपचे आजोबा ९७ वर्षीय करम सिंग सैनी हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी जपानमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या सेनेत काम केले. नवदीपचे वडील ६० वर्षीय अमरजीत सिंग सैनी हे हरयाणा सरकारमध्ये ड्रायव्हर होते. २०१६मध्ये नवदीपच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियागौतम गंभीर