IND v SA: 'या' भारतीय गोलंदाजानं केलं सचिन तेंडुलकरला इम्प्रेस; केली प्रशंसा

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या सिराजनं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. त्यानं लॉर्ड्स कसोटीत ८ विकेट्स घेत कपिल देव यांचा विक्रम मोडला होता.

महान फलंदाज सचिन तेंडुलकर जेव्हा काही बोलतो किंवा आपलं मत व्यक्त करतो तेव्हा सर्वजण लक्षपूर्वक ते ऐकत अतात. सचिन जेव्हा एखाद्या क्रिकेटपटूची स्तुती करतो तेव्हा तो त्या खेळाडूसाठी सर्वात संस्मरणीय क्षण ठरतो.

युवा प्रतिभेवर सचिनची करडी नजर आहे. पृथ्वी शॉ. सूर्यकुमार यादव असेल किंवा मग इशान किशन अशा अनेक तरुण क्रिकेटपटूंचं यापूर्वीही सचिनने कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर त्या क्रिकेटपटूंनी त्यांच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.

सचिनने आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचेही कौतुक केले आहे. सचिनने २७ वर्षीय वेगवान गोलंदाजाच सिराजची एनर्जी आणि त्याच्या बॉडी लँग्वेजचे कौतुक केले आहे. तसंच सिराजच्या अफाट यशामागेही त्याने दोन कारणेही सांगितली.

बोरिया मजुमदार यांनी संवाद साधताना सचिनला सिराजबद्दल प्रश्न विचारला. तसंच सिराजच्या कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही जास्त प्रभावित झाला आहात, असंही त्यांनी विचारलं. याचं उत्तर देताना सचिननं तोंडभरुन त्याचं कौतुक केलं.

त्याच्या पायांमध्ये स्प्रिंग्स लावल्यासारखं मला वाटतं. त्याचा रनअप पाहा, त्याच्यात खुप एनर्जी आहे. सिराज हा असा गोलंदाज आहे की ज्याच्याकडे पाहून तुम्ही तो पहिली ओव्हर टाकतोय का शेवटची याचा अंदाज घेऊ शकत नाही. तो पूर्णपणे तग धरुन गोलंदाजी करतो आणि ते मला पाहायला आवडतं, असं सचिननं सांगितलं.

'सिराज हा योग्य वेगवान गोलंदाज आहे. त्याची देहबोली जबरदस्त आहे. तो नेहमी सकारात्मक राहतो. एका गोलंदाजात मला या दोन गोष्टी आवडतात. एवढेच नाही तर सिराज हा फास्ट लर्नर आहे असंही सचिननं सांगितलं.

गेल्या वर्षी जेव्हा तो ऑस्ट्रेलियात खेळला आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्याने कसोटी पदार्पण केले, तेव्हा तो पहिल्यांदाच कसोटी सामना खेळत आहे असे वाटत नव्हते. पण त्याने पहिल्याच सामन्यापासून परिपक्वता दाखवली. त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपली स्पेल टाकली, त्यानं कधीही मागे वळून पाहिलं नसल्याचंही त्यानं नमूद केलं.

सिराजने २०१७ मध्ये टी-२० सामन्यातून भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने २०१९ मध्ये एकदिवसीय आणि त्यानंतर २०२० मध्ये कसोटी सामनयात पदार्पण केले.

सिराजने आतापर्यंत भारतासाठी १० कसोटी सामन्यात ३३ बळी घेतले आहेत. त्याने ४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४ विकेट्सही घेतल्या आहेत. भारतीय वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती.

भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज यानं अवघ्या ७ कसोटी सामन्यांत जगाला त्याच्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या सिराजनं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. त्यानं लॉर्ड्स कसोटीत ८ विकेट्स घेत कपिल देव यांचा विक्रम मोडला. भारतानं मिळवलेल्या १५१ धावांच्या विजयात सिराजचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. त्याच्या या कामगिरीचे फक्त भारतातच नव्हे, तर पाकिस्तानातूनही कौतुक होत आहे.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू ते पत्रकार मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीचे कौतुक करत आहेत. पाकिस्तानची प्रसिद्ध क्रीडा पत्रकार जैनब अब्बास ( Zainab Abbas) ही पण सिराजची फॅन बनली आहे. तिनं एक व्हिडीओ पोस्ट करून सिराजला वर्ल्ड क्लास गोलंदाज संबोधले आहे.

जैनब अब्बास म्हणाली, मोहम्मद सिराज हा वर्ल्ड क्लास गोलंदाज बनत चालला आहे. ज्या प्रकारे त्यानं ऑस्ट्रेलियात दबदबा गाजवला आणि आता लॉर्ड्सवर इंग्लंडची दैना केली. त्याच्याकडे गती आहे, चेंडूवर ताबा ठेवण्याचे कौशल्य आहे, तो चेंडूला बाहेरच्या दिशेनं घेऊन जातो आणि त्याची लाईन लेंथ कमाल आहे.

जैनब म्हणाली भारताकडे १०-१५ वर्षांपूर्वी असे जलदगती गोलंदाज नव्हते. आता भारत या जलदगती गोलंदाजांमुळे अव्वल दर्जाचा संघ बनला आहे. ती म्हणाली, जसप्रीत बुमराहचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. इशांत शर्मानंही चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद शमीला विसरून चालणार नाही. शमीनं फलंदाजीतही दमदार कामगिरी करून दाखवली आणि त्याला बुमराहनं चांगली साथ देत सामनाच पलटला.