पाकिस्तानचा संघ भारतात येण्यासाठी सज्ज; World Cup Super Leagueमध्ये मोठी झेप, जाणून घ्या लीगचं महत्त्व

Explainer: ICC Men's Cricket World Cup Super League - कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाने भारतात होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड २०२३ स्पर्धेची थेट पात्रता निश्चित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे

Explainer: ICC Men's Cricket World Cup Super League - कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाने भारतात होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड २०२३ स्पर्धेची थेट पात्रता निश्चित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. पाकिस्तानने गुरुवारी नेदरलँड्सवर विजय मिळवून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आणि वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

पाकिस्तानने या मुसंडीसह भारतात होणार्या वन डे वर्ल्ड कप साठी थेट पात्रता मिळवण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल टाकलं आहे. पण, यजमान भारतीय संघ अजूनही सातव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने १८७ धावांचे लक्ष्य ७ विकेट्स राखून सहज पार केले. कर्णधार बाबर आजम ( ५७), मोहम्मद रिझवान ( ६९*) व आघा सलमान ( ५०*) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने हा विजय मिळवला.

इंग्लंड व बांगलादेश अनुक्रमे १२५ व १२० गुणांसह पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तान ११० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आला असून अफगाणिस्तानच्या खात्यात १०० गुण आहेत. न्यूझीलंड, वेस्ट इंडीज व भारत हे शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत.

वर्ल्ड कप सुपर लीग ही नवीन वन डे सामन्यांची स्पर्धा आहे. जी दोन वर्ष खेळवली जातेय. प्रथमच असा प्रयोग आयसीसीकडून होत आहे आणि या लीगमधून २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत कोणते संघ खेळतील हे ठरवले जातील. १३ संघांचा या लीगमध्ये सहभाग आहे आणि त्यात १२ पूर्ण सदस्यांचा व नेदरलँड्सचा समावेश आहे.

या लीगमध्ये कोणता संघ कितव्या स्थानी राहतो, त्यावर त्यांचे वर्ल्ड कप २०२३ मध्ये थेट खेळणे ठरणार आहे. या लीगमधील अव्वल ७ संघ वर्ल्ड कप २०२३ साठी थेट पात्र ठरतील आणि तळातील ५ संघांमध्ये पुन्हा पात्रता स्पर्धा खेळवली जाईल. लीगमध्ये एक संघ अन्य ८ संघांविरुद्ध किमान तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार. चार होम व चार अवे अशा या मालिका असतील.

प्रत्येक संघ २४ वन डे सामने खेळणार आणि प्रत्येक विजयाला १० गुण दिले जातात. टाय किंवा नो रिझल्टसाठी संघांना प्रत्येकी ५ गुण आणि पराभूत झाल्यास एकही गुण नाही. षटकांची गती संथ ठेवल्यास संघाला पेनल्टी म्हणून गुण कमी केले जातील.