भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये ससेक्ससाठी कौंटी क्रिकेट खेळत आहे. त्याची कौंटी क्रिकेटमध्ये कामगिरी अतिशय उत्तम आहे. दरम्यान, चेतेश्वर पुजाराचे वडील अरविंद पुजारा यांनी त्याच्या या खेळीमागील रहस्य उलगडलं आहे.
त्याला सध्या नियमत सराव करता येत असल्यामुळे तो सध्या कौंटी चॅम्पिअनशीप (County Cricket) मध्ये चांगली कामगिरी करत असल्याचं मत चेतेश्वर पुजाराचे वडील आणि प्रशिक्षक अरविंद पुजारा यांनी व्यक्त केलं. यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्याला सराव करता आला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
भारतासाठी ९५ कसोटी सामने खेळलेल्या अनुभवी चेतेश्वर पुजाराला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. याशिवाय अजिंक्य रहाणेलाही (Ajinkya Rahane) संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
भारताच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू असलेला पुजारा गेल्या तीन मोसमात त्याची कामगिरी टिकवून ठेवण्यात अपयशी ठरला होता आणि त्याची सरासरी ३० पेक्षा कमी होती. यामुळेच निवडकर्त्यांनी त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी संघात स्थान दिलं नाही.
या मोसमात चेतेश्वर पुजारानं ससेक्ससाठी तीन सामन्यांत दोन द्विशतकं आणि एक शतक ठोकत स्वत:ला सिद्ध केलं आहे. यामुळे पुजाराच्या जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत.
'त्याला पुरेसे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. हे त्याची कामगिरी चांगली न झाल्यामागील कारण आहे, असं वाटतं. कोरोनाच्या महासाथीमुळे रणजी सामन्यांचं आयोजन झालं नव्हतं आणि केवळ एकाच फॉर्मेटमध्ये खेळणारा चेतेश्वर कोणत्याही सरावाशिवाय कसोटी सामने खेळत होता. याशिवाय क्वारंटाइन आणि मर्यादित षटकांच्या सामन्यामुळे अनेकदा दोन कसोटी सामन्यांमध्ये मोठा कालावधी होता,' असं अरविंद पुजारा पीटीआयशी बोलताना म्हणाले.
'जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या संघाविरुद्ध खेळता, तेव्हा तुम्ही तुमच्या खेळात अव्वल असलं पाहिजं. मोठ्या सामन्यांच्या तयारीसाठी त्याला देशांतर्गत स्तरावर खेळण्यासाठी पुरेसे सामने मिळाले नाहीत. यामुळे त्याच्या खेळावर प्रतिकुल परिणाम झाला,' असंही ते म्हणाले.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर रणजी सामने पुन्हा खेळवण्यात आले. यामध्ये पुजाराला तीन सामने खेळता आले. सौराष्ट्रच्या नॉकआउटसाठी क्वालिफाय करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर पुजारा कौंटी क्रिकेटसाठी इंग्लंडला गेला. जर एखाद्याला योग्य संख्येत सामने खेळता आले नाही, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन प्रभावित होत असल्याचं अरविंद पुजारा म्हणाले.
'भारतीय संघातून बाहेर गेल्यानंतर चेतेश्वर नाराज होता. परंतु निवड तर निवडकर्त्यांच्या हाती असते. त्याला मेहनत सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. तसंच त्याचे चांगले परिणामही दिसतील असं सांगितलं,'असं त्याचे वडील म्हणाले.
'निवडीचा निर्णय निवडकर्त्यांना करायचा आहे. परदेशातील स्थितीत कठिण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि तरुणांमा मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी खेळाडूंची गरज आहे. त्याला केवळ धावा करत राहायला हवं,' असं त्यांनी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याबद्दल बोलताना सांगितलं.