भारतीय संघाने २०१९च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. पण उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले.
माजी कर्णधार धोनीचा तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. त्यानंतर वर्षभर संघात स्थान न मिळाल्याने धोनीने ऑगस्ट २०२०मध्ये निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
धोनीबरोबरच २०१९च्या विश्वचषकानंतर आणखी एका अनुभवी खेळाडूला संघातून वगळण्यात आलं आणि त्याला संघात पुन्हा अद्याप स्थान मिळालेलं नाही. तो खेळाडू म्हणजे अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik).
दिनेश कार्तिकने आतापर्यंत भारतीय संघाकडून २६ कसोटी, ९४ वन डे आणि ३२ टी२० सामने खेळले आहेत. एका मुलाखतीत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
'माझं सध्याचं मुख्य ध्येय म्हणजे टीम इंडियासाठी पुन्हा एकदा खेळणं. टी२० संघात मला खेळायचंय. कारण टी२०ची आग अद्यापही थंडावलेली नाही.', असं कार्तिक म्हणाला.
'मला अजूनही टीम इंडियात खेळण्याची इच्छा आहे. त्यासाठीच सध्या मी ट्रेनिंग, सराव आणि व्यायाम करत असतो. पुढील तीन वर्षे मी क्रिकेट खेळतच राहणार. कारण मला क्रिकेट मनापासून आवडतं', अशी भावना कार्तिकने व्यक्त केला.
'टीम इंडियामध्ये संधी मिळावी म्हणूनच मी अजूनही सैयद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे स्पर्धा खेळतो. या स्पर्धा खेळल्याने मी क्रिकेटमध्ये 'अप टू डेट' राहतो', असं कार्तिकने सांगितलं.
'टी२० वर्ल्ड कप २०२१ मध्ये भारताच्या संघात फिनिशरची भूमिका पार पाडणारा योग्य खेळाडू मिळत नव्हता. हीच भूमिका पार पाडायला मला आवडेल', अशी इच्छा त्याने व्यक्त केली.
'माझं टीम इंडियाकडून खेळतानाची आकडेवारी, कामगिरी तसेच देशांतर्गत स्पर्धा आणि IPL मधील कामगिरी पाहिली तर मी नक्कीच दमदार खेळ करून दाखवला आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही. माझा खेळंच साऱ्यांना उत्तर देईल', असा विश्वास दिनेश कार्तिकने व्यक्त केला.