Join us  

ऐतिहासिक आठवडा! IPL मध्ये प्रथमच घरच्या मैदानावर यजमान 'ढेर', पाहुणा संघ ठरला 'शेर'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 1:10 PM

Open in App
1 / 10

सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे. १६ वा हंगाम सुरू होऊन आता १५ दिवस उलटले आहेत. जवळपास सर्वच संघानी आपले पहिले ३ सामने खेळले असून गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानी आहे.

2 / 10

लखनौ सुपर जायंट्स आणि गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. मावळता आठवडा आयपीएलसाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण प्रथमच एका आठवड्यात झालेल्या सामन्यांमध्ये घरच्या मैदानांवर खेळलेल्या सर्व संघांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

3 / 10

या आठवड्यात घरच्या मैदानावर पराभूत झालेल्या संघामध्ये पंजाब किंग्ज, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या ५ संघांचा समावेश आहे.

4 / 10

फाफ डू प्लेसिसच्या आरसीबीला त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चिन्नस्वामी स्टेडियमवर पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय पंजाबला देखील आपल्या घरच्या मोहालीच्या मैदानात पराभूत व्हावे लागले.

5 / 10

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सने त्यांच्या घरात जाऊन पराभवाची धूळ चारली. एम ए चिदंबरम येथे झालेल्या सामन्यात यजमान चेन्नईचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला. तर काल झालेल्या सामन्यात हॅरी ब्रूकच्या शतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने यजमान कोलकाताला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले.

6 / 10

यंदाच्या हंगामातील पंधराव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने होते. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या. २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौने सांघिक खेळी केली. मार्कस स्टॉयनिस (६५) आणि निकोलस पूरन (६२) यांनी केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर लोकेश राहुलच्या संघाने चिन्नस्वामी स्टेडियमवर बंगळुरूला पराभवाची धूळ चारली.

7 / 10

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. कर्णधार रोहित शर्माने ४५ चेंडूत ६५ धावा करून दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर यजमानांना पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत सर्वबाद १७२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने रोहित शर्मा (६५) आणि तिलक वर्मा (४१) यांच्या खेळीच्या जोरावर विजयाचे खाते उघडले. मुंबईने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून दिल्लीचा पराभव केला.

8 / 10

आयपीएलच्या १६व्या हंगामातील सतरावा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. राजस्थानने रॉयल विजय मिळवत धोनीच्या चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असलेल्या चेन्नईला निर्धारित २० षटकांत ८ बाद १७२ धावा करता आल्या. त्यामुळे राजस्थानने ३ धावांनी विजय मिळवून २ गुण मिळवले.

9 / 10

बुधवारी मोहाली येथे झालेल्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने यजमान पंजाब किंग्जचा ६ गडी आणि १ चेंडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाबने २० षटकांत ८ बाद १५३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.५ षटकांत ४ बाद १५४ धावा करून विजय साकारला.

10 / 10

काल झालेल्या ईडन गार्डन्सवरील सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूकने शतकी खेळी करून यजमान कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ब्रूकच्या शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २२८ धावा केल्या. २२९ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा कर्णधार नितीश राणा (७५) आणि रिंकू सिंग (५८) यांनी स्फोटक खेळी केली पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अखेर हैदराबादने २३ धावांनी विजय मिळवून यजमान केकेआरचा पराभव केला.

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्सरोहित शर्मा
Open in App