Shane Warne Death : शेन वॉर्नला स्वप्नात सतवायचा सचिन तेंडुलकर?; ऑस्ट्रेलियन दिग्गजानं सांगितलं होतं सत्य

फिरकी गोलंदाजीला वेगळी उंची मिळवून देणारा ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्यावर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले.

फिरकी गोलंदाजीला वेगळी उंची मिळवून देणारा ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्यावर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापन कंपनीद्वारा ही दु:खद बातमी मिळाली. वॉर्नच्या व्यवस्थापन कंपनीने ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांना एका पत्रकाद्वारे माहिती देताना, वॉर्नचे थायलंडमधील समुई येथे निधन झाल्याचे सांगितले.

वॉर्नच्या निधनानंतर फॅन्सनी सचिन तेंडुलकरनं शारजाहमध्ये खेळलेले ऐतिहासिक सामन्यांचीही आठवण काढली. १९९८ मध्ये कोका कोला कपमध्ये सचिननं अखेरच्या दोन सामन्यांमध्ये शेन वॉर्नच्या गोलंदाजीचा समाचार घेतला होता. त्यानंतर एकदा त्यानं सचिन तेंडुलकर आपल्याला स्वप्नातही दिसत असल्याचं मजेमजेत सांगितलं होतं.

कोका-कोला कपच्या सहाव्या सामन्यात भारताला 46 षटकात 276 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले होते. सचिन सौरव गांगुलीसोबत ओपनिंगला उतरला. सचिनने ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना खेळायला सुरुवात केली, त्याचा राग फलंदाजीत दिसून येत होता.

सचिनने विशेषतः शेन वॉर्न, कॅसप्रोविट्झ, स्टीव्ह वॉ, टॉम मूडी अशा कोणालाही सोडले नाही आणि पुढे जाऊन चौकार आणि षटकार मारले. परंतु भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारताने हा सामना गमावला असला तरी नेट रनरेटच्या जोरावर त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. यानंतर, 24 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये सचिनने 25 व्या वाढदिवसाला 134 धावा केल्या आणि भारताने ट्रॉफी जिंकली.

सचिनच्या या खेळीनंतर सचिन आपल्या स्वप्नातही षटकार मारून घाबरवायचा, असं वक्तव्य त्यानं केलं होतं. परंतु एका मुलाखतीत त्यानं हे वक्तव्य हलकफुलकं आणि मजा म्हणून केल्याचंही म्हटलंही होतं.

शेन वॉर्नच्या फिरकीवर खेळणं भल्या भल्या फलंदाजाही जमत नसे. वॉर्नच्या एका चेंडूनं इतिहासात नोंद केली होती आणि फलंदाजासह सर्वांनाच अचंबित केलं होतं. शेन वॉर्नचा तो चेंडू 'बॉल ऑफ द सेंच्युरी' म्हणून ओळखला गेला.

ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज फिरकीपटू १४ वर्षांपूर्वी आपली शेवटची कसोटी खेळला. पण आजही तो 'लेग-स्पिनचा राजा' म्हणून ओळखला जात होता. त्यानं टाकलेला एक चेंडू 'बॉल ऑफ द सेंच्युरी' म्हणून ओळखला गेला होता.

२८ वर्षांपूर्वी मॅन्चेस्टरमध्ये इंग्लंड विरुद्धच्या अॅशेस मालिकेत इंग्लंडचा फलंदाज माइक गॅटिंग याला शेन वॉर्ननं अफलातून फिरकीच्या जोरावर क्लिन बोल्ड करत सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. कारण त्यानं टाकलेल्या चेंडूनं चक्क ९० डीग्री अंशात फिरकी घेतली होती आणि गॅटिंगचा त्रिफळा उडाला. माइक गॅटिंग याला तर काही क्षण आपल्यासोबत नेमकं काय घडलंय हेही कळालं नव्हतं.