पाकिस्तानी संघात मोठा बदल हवा; आफ्रिदीने टीम इंडियाची कॉपी करण्याचा सल्ला दिला

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे.

आगामी काळात क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक पार पडणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपल्या संघाला एक सल्ला दिला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व तिन्ही फॉरमॅटसाठी एकाच खेळाडूकडे संघाची धुरा सोपवायला हवी, असे आफ्रिदीने सांगितले. वन डे विश्वचषकातील पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

बाबरच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शान मसूदकडे कसोटी संघाचे नेतृत्व दिले. तर शाहीन आफ्रिदी ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनला. याचाच दाखला देत आफ्रिदीने सांगितले की, एक संघ एक कर्णधार असेल तर चांगली प्रगती होईल.

खरं तर अद्याप पाकिस्तानच्या वन डे संघाच्या कर्णधाराचे नाव समोर आलेले नाही. विश्वचषकानंतर शेजाऱ्यांनी एकही ५० षटकांचा सामना खेळला नाही. अलीकडेच न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानला पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत १-४ असा पराभव पत्करावा लागला.

आफ्रिदी म्हणाला की, एकाच खेळाडूकडे तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद असेल तर त्याचा संघाला फायदा होतो. ड्रेसिंगरूममधील खेळाडूंना देखील खूप फायदा होतो, त्यांना अनेक गोष्टी शिकता येतात, कारण एकाच खेळाडूकडे सगळा चार्ज असतो. एकूणच भारतीय संघाप्रमाणे पाकिस्तानने देखील एक संघ एक कर्णधार असे धोरण राबवायला हवे, असे आफ्रिदीने सांगितले. तो माध्यमांशी बोलत होता.

"पाकिस्तानच्या संघात असलेल्या खेळाडूंना आत्मविश्वास देण्याची गरज आहे. ट्वेंटी-२० संघात फखर जमान आणि सैय अयुब यांना पाहायला मला आवडेल. विश्वचषक तोंडावर आहे त्यामुळे संघाचा संचालक मोहम्मद हफिजने कोणतेही मोठे बदल न करता खेळाडूंना शक्य तेवढी मदत करायला हवी", असेही आफ्रिदीने विश्वचषकाबद्दल म्हटले.

एखाद्या खेळाडूला कर्णधारपद सोपवले तर किमान त्याला तीन वर्ष संधी द्यायला हवी, एखादी मालिका, सामना किंवा मोठी स्पर्धा खराब गेल्याने खेळाडूला त्या पदावरून काढून टाकणे हे उचित नसल्याचेही आफ्रिदीने सांगितले.