भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतही त्याचा फॉर्म फारसा चांगला नव्हता. त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
खराब फॉर्मच्या कारणास्तव लोकेश राहुलला प्रथम भारतीय संघाच्या उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले.
लोकेश राहुलच्या खेळीवर सातत्याने टीका होत असताना आता संघाचा माजी सलामीवीर मुरली विजयने एक मोठे विधान केले आहे. त्याने राहुलला पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.
लोकेश राहुलने त्याच्या मूलभूत गोष्टींवर काम केले पाहिजे आणि जोरदार पुनरागमन केले पाहिजे. याशिवाय त्याला आणखी काही करण्याची गरज नसल्याचे मुरली विजयने सांगितले.
लोकेश राहुल मागील मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. याच कारणास्तव त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागले.
केएल राहुलने फक्त त्याच्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मुरली विजयने म्हटले. तो सध्या लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया महाराजा संघाचा भाग आहे.
तिथे मुरली विजयला लोकेश राहुलबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, 'लोकेश राहुलला माहिती आहे की त्याला पुनरागमन करण्यासाठी काय करावे लागेल. माझ्या मते, त्याला एकटे सोडले पाहिजे आणि आता जसे घडत आहे त्याबाबत सातत्याने भाष्य केले नाही पाहिजे.'
'हे कोणत्याही क्रिकेटपटूसोबत होऊ शकते. माझ्या मते, लोकेश राहुलने त्याच्या मूलभूत गोष्टींवर काम केले पाहिजे आणि जोरदार पुनरागमन केले पाहिजे', असे मुरली विजयने हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना म्हटले.
यापूर्वी शेन वॉटसनने देखील लोकेश राहुलच्या फॉर्मबद्दल भाष्य केले होते. तो म्हणाला होता की, लोकेश राहुलसाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःला मोकळेपणाने खेळण्याची परवानगी देणे हीच आहे.
खरं तर समस्या अशी आहे की तो संघातील त्याच्या स्थानाबद्दल खूप चिंतित आहे आणि यामुळे, तो पूर्ण स्वातंत्र्याने खेळू शकत नाही आणि त्याच्या कौशल्याचा पूर्ण फायदा घेऊ शकत नाही, असे ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने अधिक सांगितले.