"भारत अनेकदा फायनलमध्ये हरतो कारण...", 'युवी'ने महत्त्वाच्या पदासाठी व्यक्त केली इच्छा

yuvraj singh mentor: आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे.

भारतीय संघाला मोठ्या व्यासपीठांवर मागील दशकापासून सतत अपयश आले आहे. आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. आगामी काळात ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे, त्यामुळे भारतीय शिलेदार तमाम भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणार का हे पाहण्याजोगे असेल.

वन डे विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवेल अशी आशा होती. पण, सलग दहा सामने जिंकलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.

दरम्यान, भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगने संघाच्या हितासाठी टीम इंडियासोबत काम करायची इच्छा बोलून दाखवली आहे. आगामी आव्हानांसाठी भारतीय क्रिकेट संघाला मानसिकदृष्ट्या तयार करण्यासाठी भविष्यात 'गुरू'ची भूमिका बजवायला आवडेल, असे त्याने सांगितले.

भारताने मागील वर्षी वन डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारला आणि आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षा आणखी लांबली.

खरं तर भारताने शेवटच्या वेळी २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, तर यापूर्वीचा विश्वचषक २०११ मध्ये जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघाने आयसीसीचा किताब जिंकावा अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे.

एका कार्यक्रमात बोलताना भारताच्या सिक्सर किंगने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तो म्हणाला की, आपण अनेकदा मोठ्या व्यासपीठावर चांगले खेळलो आहोत, पण अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. २०१७ मध्ये मी एका अंतिम सामन्याचा भाग होतो. तेव्हा भारताला पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते.

मला वाटते की, एक देश म्हणून आणि भारतीय संघ म्हणून आम्हाला दबावाखाली चांगली कामगिरी करावी लागेल. माझ्या मते युवा खेळाडूंना प्रेरणा देणं, त्यांना दडपण कसं हाताळायचं आणि दबावाखाली कामगिरी कशी करायची हे शिकवणं. हे आव्हान ठरले आहे, असे युवराजने नमूद केले.

"त्यामुळे मला वाटते की, खेळाडूंनी दबावाच्या स्थितीत कसे खेळायला हवे, यावर अभ्यास केला पाहिजे. आगामी काळात मला भारतीय संघातील शिलेदारांना मार्गदर्शन करायला आवडेल"

युवीने आणखी सांगितले की, पुढील काही वर्षांत जेव्हा माझी मुले मोठी होतील, तेव्हा मी क्रिकेटमध्ये परतेन आणि तरुणांना मार्गदर्शन करेन. खेळाडूंना घडवण्यासाठी मला भारतीय संघाचा मार्गदर्शक व्हायला आवडेल.

तसेच मला वाटते की मोठ्या स्पर्धांमध्ये आम्हाला अनेक मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो. मला विश्वास आहे की मानसिक दृष्टिकोनातून मी भविष्यात या खेळाडूंसोबत काम करू शकेन. मला वाटते की मी यात योगदान देऊ शकतो, विशेषत: मधल्या फळीतील फलंदाजांना मी चांगले मार्गदर्शन करू शकतो, असेही सिक्सर किंगने सांगितले.