Rohit Sharma Team India Captaincy: रोहितनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? माजी क्रिकेटरने सांगितले ३ पर्याय

पाहा, तुम्हाला हे पर्याय पटतात का?

Rohit Sharma Team India: टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी दिवसेंदिवस उत्तम होत आहे. पण असे असले तरीही रोहितनंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

रोहितनंतर टीम इंडियाचे कसोटी आणि एकदिवसीय कर्णधारपद कोण सांभाळू शकेल, असा सवाल भारताचा क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला (Robin Uthappa) विचारण्यात आला. त्यावर त्याने एक अनपेक्षित पण साऱ्यांनाच पटेल असं उत्तर दिले.

उथप्पा सुरूवातीला विराटबाबतच्या प्रश्नावर बोलला. तो म्हणाला, "विराट कोहली ज्या क्षमतेचा आणि ज्या प्रतिभेचा खेळाडू आहे, त्यासारख्या फलंदाजाबाबत बोलण्याची आमच्यासारख्यांची पात्रताच नाही. विराट कोहली हा एक मॅचविनर खेळाडू आहे." त्यानंतर उथप्पाने कर्णधारपदाबाबत उत्तर दिले.

रॉबिन उथप्पाने सांगितले, "रोहित शर्माच्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये त्याच्यासोबत जास्त काळ अनुभव घेतलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा एक उत्कृष्ट कसोटी कर्णधार बनू शकतो."

"बुमराहने अलीकडेच एजबॅस्टन येथे इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. त्यात भारताचा पराभव झाला पण बुमराहची नेतृत्वशैली त्यातही खुलून दिसली", असे उथप्पा म्हणाला.

"बुमराह हा जसा कसोटी क्रिकेटसाठी उत्तम कर्णधार असेल. तसेच वन-डे क्रिकेटसाठी केएल राहुल किंवा रिषभ पंत हे दोन पर्याय अधिक चांगले असू शकतील", असेही मत उथप्पाने मांडले.