राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याकडे टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे गेल्यानंतर BCCI भारताचे माजी क्रिकेटपटू VVS लक्ष्मण यांच्याकडेही मोठी जबाबदारी सोपवू शकते. बीसीसीआय त्यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख बनवू शकते, अशी माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी नेहमीच यावर भर दिला आहे की भारताचे माजी क्रिकेटपटू सिस्टममध्ये येऊन खेळाला भारतात पुढे नेण्यास मदत करू शकतात. सौरव गांगुलीनं राहुल द्रविड यांना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनण्यास मनवलंय. आता लक्ष्मण यांनी एनसीएचे प्रमुख पद स्वीकारावं अशीही त्यांची इच्छा आहे.
एएनआयशी बोलताना सूत्रांनी सांगितले की, केवळ बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुलीच नाही तर सचिव जय शाह आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्मण यांनी एनसीएचे प्रमुख म्हणून काम करावे अशी इच्छा आहे.
कारण बीसीसीआयने द्रविड यांच्यासोबत एनसीए प्रमुख म्हणून गेल्या काही वर्षांत काम केले आहे. सौरव गांगुली आणि जय शाह या दोघांनाही लक्ष्मण हे एनसीएच्या प्रमुख भूमिकेत असावेत असं वाटत आहे. परंतु याचा अंतिम निर्णय हा व्हीहीएस लक्ष्मण यांचाच असेल असंही सूत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.
एनसीएच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यासाठी त्यांचं नाव आघाडीवर आहे यात कोणतीही शंका नाही. त्यांचे राहुल द्रविड यांच्यासोबतही उत्तम संबंध आहेत हे आपण विसरायला नको. दोघंही भारतीय क्रिकेटला पुढे नेतील हे अतिशय उत्तम असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेपासून राहुल द्रविड हे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. अशातच आता लक्ष्मण आपल्या नव्या भूमिकेसाठी सहमत होतात का हे पाहावं लागणार आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतनंतर होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेईल. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपणार आहे आणि त्यामुळे बीसीसीआयनं या पदासाठी अर्ज मागवले होते.
द्रविडनं २०१५ ते २०१९ या कालावधीत भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम केलं आहे. सध्या ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०१८ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवणे ही सर्वात मोठी सन्मानाची गोष्ट आहे. या नव्या जबाबदारीसाठी मी कटीबद्ध असेन. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं चांगली कामगिरी केली आणि मी आशा करतो की तशीच कामगिरी माझ्या कार्यकाळात होईल. या संघातील अनेक खेळाडूंसोबत NCA, U 19 आणि India A संघात असताना काम केले आहे. पुढील दोन वर्षांत अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आहेत, यासाठी मी सज्ज आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील खेळाडूंना प्रत्येक दिवसागणित स्वत:मध्ये सुधारणा घडवण्याची सवय आहे आणि हीच सर्वात चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी घोषणेनंतर दिली होती.