गौप्यस्फोट! ...तर इतिहास वेगळा असता; धोनी CSK नव्हे, RCBकडून खेळला असता

आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा संघ आणि महेंद्रसिंह धोनी हे समीकरणच झालंय. मध्यंतरी दोन वर्षे चेन्नईच्या संघाला फिक्सिंगमुळे आयपीएलबाहेर जावं लागलं. मात्र बंदी उठताच चेन्नईची धुरा धोनीच्या खांद्यावर आली.

चेन्नई म्हटलं की धोनी हे गेल्या १३ वर्षांतलं समीकरण. पण १३ वर्षांपूर्वी अशा काही घडामोडी सुरू होत्या की कदाचित धोनी चेन्नईकडून नव्हे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाकडून खेळताना दिसला असता.

२००७ मध्ये भारतानं पहिलावहिला टी-२० विश्वचषक जिंकला. त्याआधी झालेल्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ साखळी स्पर्धेतच गारद झाला होता. त्यामुळे पहिल्यावहिल्या टी-२० स्पर्धेत कोणालाच भारतीय संघाकडून फारशा आशा नव्हत्या.

२००७ मध्ये एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत उतरला. त्यावेळी भारताच्या संघात अनेक नवोदित खेळाडूंचा भरणा होता. या स्पर्धेचं अजिंक्यपद भारतानं पटकावल्यानं बीसीसीआयला आयपीएलची कल्पना सुचली.

२००८ पासून आयपीएलला सुरुवात झाली. धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानं लिलावादरम्यान सगळ्यांच्या नजरा धोनीवर होत्या.

२००८ मध्ये चेन्नईनं धोनीला ९.२५ कोटी रुपये मोजून स्वत:च्या ताफ्यात घेतलं. त्यावेळी सर्वाधिक बोली धोनीसाठीच लागली होती.

२००८ ते २०१८ या कालावधीत आयपीएलमध्ये ऑक्शनर राहिलेल्या रिचर्ड मॅडले यांनी धोनीबद्दल नुकताच एक गौप्यस्फोट केला.

धोनीला आपल्या संघात घेण्यासाठी आरसीबीनंदेखील प्रयत्न केले होते. मात्र त्यांनी कमी बोली लावली. त्यांना हा गोष्टीचा पश्चाताप होत असेल, असं मॅडले यांनी सांगितलं.

धोनीसाठी आरसीबीनं लावलेली बोली फारशी नव्हती. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार गमावल्याचं दु:ख त्यांना वाटत असेल, असं मॅडले म्हणाले.

आरसीबीचे माजी मुख्य कार्याधिकारी चारू शर्मांनीदेखली गेल्याच वर्षी यावर भाष्य केलं होतं. क्रिकेट सांघिक खेळ आहे. त्यामुळे धोनी शून्यावर बाद झाला, अपयशी ठरल्यास काय, असा विचार आम्ही केला. त्यामुळेच आम्ही लिलाव प्रक्रियेत मागे हटलो, असं शर्मा म्हणाले होते.