Join us

IND vs NZ Test Match: विराट कोहलीला आऊट देण्याचा निर्णय का योग्य होता; माजी किवी खेळाडूनं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 09:23 IST

Open in App
1 / 9

India vs New Zealand, 2nd Test : विराट कोहलीनं (Virat Kohli) पुनरागमनाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत मागील दोन दिवस सुरू असलेल्या पावसाच्या खेळीमुळे भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ १२ वाजता सुरू झाला. मयांक अग्रवाल (Mayank Agarwak) व शुबमन गिल (Shubhman Gill) यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा संयमानं सामना करताना अर्धशतकी भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली.

2 / 9

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या विराटला भोपळ्यावर माघारी जावं लागलं. पण, त्याच्या या विकेटनं मोठा गोंधळ सुरू झाला आहे. विराटनं स्वतः डोक्यावर हात मारून घेतला.

3 / 9

टीव्ही अम्पायर वीरेंद्र शर्मा यांनी अनेक वेळा रिप्ले पाहिला आणि त्यांनाही चेंडू आधी पॅडला लागलाय की बॅटला हेच स्पष्ट दिसले नाही. त्यामुळे त्यांनी मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखताना विराटला बाद दिले.

4 / 9

यावेळी वीरेंद्र शर्मा यांनी बॉल ट्रॅकींग डिव्हाईस न पाहताच विराटला बाद दिल्याचेही दिसले. खरंच चेंडू पहिला पॅडला लागला होता की नाही, यावरून वाद सुरू झालाय. विराटनंही या निर्णयाची दाद मागितली अन् पेव्हेलियनमध्ये जाऊन रिप्ले पाहून डोक्यावर हात मारला.

5 / 9

दरम्यान, न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि समालोचक सायमन डूलनं विराटला बाद देण्याच्या निर्णयाचं समर्थनं केलं आहे. 'टीव्ही अंपायरना मैदानावरील अंपायचा निर्णय बदलण्यासाठी काही पुरावे आवश्यक होतं. परंतु असं झालं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी प्रक्रियेचं पालन केलं आणि त्यांची प्रक्रिया योग्य होती,' असं त्यानं म्हटलं.

6 / 9

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीची ( Virat Kohli) फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची निराशा झाली. अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयामुले विराटला शून्यावर माघारी परतावे लागले. पण, मयांक अग्रवाल (Mayank Agarwal ) व शुबमन गिल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवलं होतं.

7 / 9

अजाझ पटेलच्या गोलंदाजीवर विराटला LBW दिले गेले, तिसऱ्या अम्पायरलाही नेमकं काय झालं ते कळलं नाही आणि त्यानं मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखला. चेंडू आधी पॅडला लागला की बॅटला यावरून तिसरा अम्पायर गोंधळला. पण, त्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार धुलाई झाली. पार्थिव पटेल, वासीम जाफर यांच्यासह बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही अम्पायरच्या निर्णयावर टीका केली.

8 / 9

दरम्यान, पहिल्या दिवशी फलंदाज मयांक अग्रवालनं उत्तम फलंदाजी करत शतक ठोकलं. यानंतर त्यानं भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचे आभार मानले. एकाग्रता राखून मोठी खेळी करण्याचा सल्ला कोच राहुल द्रविड यांनी दिला होता. आपल्या हातात असलेल्या अनेक गोष्टींवर नियंत्रण राखण्याचा त्यांचा कानमंत्र उपयुक्त ठरल्यामुळे नाबाद शतक झळकावू शकलो, असे मत सलामीवीर मयांक अग्रवाल याने व्यक्त केले.

9 / 9

'या सामन्याआधी दिग्गज सुनील गावसकर यांचे काही व्हिडिओ पाहिले. त्यानुसार खांद्याचा वापर करण्यात बदल केला. माझ्यासाठी हे तंत्र लाभदायी ठरले. अंतिम एकादशमध्ये निवड होताच मी द्रविड यांच्यासोबत संवाद साधला. जे तुझ्या हातात आहे त्यावर नियंत्रण ठेव, तसेच मैदानावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत राहा. चांगली सुरुवात झाल्यास मोठी खेळी करण्याकडे वाटचाल करण्याचा सल्ला त्यांनी मला दिला. मला जी सुरुवात लाभली त्याचे सोने करीत मी शतक ठोकू शकलो,' असंही त्यानं नमूद केलं.

टॅग्स :विराट कोहलीभारतन्यूझीलंड
Open in App