"मुंबईत भारताला हरवून पाकिस्ताननं वर्ल्डकप जिंकावा आणि आमचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरने व्यक्त केली इच्छा

shoaib akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतो.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतो. तो कधी पाकिस्तानी संघावर तर कधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर आक्षेप घेऊन सर्वांचे लक्ष वेधत असतो. आता अख्तरने भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाबद्दल एक मोठे विधान केले आहे.

या वर्षाच्या अखेरीस भारतात वन डे विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. आगामी स्पर्धेत पाकिस्तानी संघाने भारताला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पराभूत करून जेतेपद पटकावावे, अशी आपली इच्छा असल्याचे अख्तरने म्हटले आहे.

2011च्या विश्वचषकात भारताकडून झालेल्या पराभवाचा बदला घ्यायचा असल्याचे शोएब अख्तरने सांगितले. जर भारताला पराभूत केले तरच 2011च्या विश्वचषकातील बदला पूर्ण होईल असे त्याने स्पष्ट केले.

खरं तर 2011 च्या विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला होता. शोएब अख्तरही त्या विश्वचषक संघाचा भाग होता पण त्याला उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने खुलासा केला होता की, शोएब अख्तरने त्याच्याकडे फायनलसाठी तिकीट मागितले होते कारण त्याला खात्री होती की उपात्य फेरीमध्ये पाकिस्तान भारताचा पराभव करेल आणि अंतिम फेरीत जाईल. मात्र, तसे झाले नाही.

2011च्या विश्वचषकात भारताकडून झालेल्या पराभवाची झळ आजही अख्तरच्या मनात ताजी आहे. त्यामुळेच पाकिस्तानी संघाने यावेळी भारताला हरवून मागील पराभवाची परतफेड करावी असे त्याला वाटते.

पाकिस्तानमधील एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान बोलताना त्याने म्हटले, "2011 च्या विश्वचषकात मोहालीत भारताकडून झालेल्या पराभवामुळे मला राग आला आहे. मला या पराभवाचा बदला घ्यायचा आहे, जो आणखी 8 महिन्यांनी पूर्ण होऊ शकतो."

"विश्वचषकाची स्पर्धा भारतात होत आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजत आहे, भारताचा पराभव होत आहे आणि आम्ही विश्वचषक उंचावला आहे, असे माझे स्वप्न आहे", अशा शब्दांत अख्तरने त्याची इच्छा व्यक्त केली आहे.

याशिवाय आम्ही भारताचे खूप खूप आभार मानू. कारण आम्ही आमचा विश्वचषक भारताला हरवून परत घेवू असे शोएब अख्तरने आणखी म्हटले.

शोएब अख्तरने असेही म्हटले आहे की, पाकिस्तानी संघ यावेळी कशी खेळी करतो याची मला पर्वा नाही. पण पाकिस्तानने विश्वचषक जिंकायलाच हवा. कारण भारताने केलेल्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.